मुंबई : राज्यातील कॅब, रिक्षा आणि टॅक्सीचालक आपल्या मागण्यांसाठी आता आक्रमक झाले आहेत. महायुती विरोधात मतदान करण्याची 30 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात शपथ घेणार आहेत.
भारतीय गिग कामगार मंचच्या गुरुवारी आझाद मैदानात सभा झाली. या सभेत वरील निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष डॉ.केशव क्षीरसागर यांनी दिली. दरम्यान, कॅब, रिक्षा व टॅक्सी चालकांनी टेस्ला मंत्री, हाय हाय अशा घोषणा यावेळी दिल्या.
डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, कॅब, रिक्षा व टॅक्सी चालकांनी ओला, उबर, रॅपिडो या कंपन्याच्या दराबाबत राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त यांना निवेदन दिले होते. त्यांनी दराची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ओला, उबर व रॅपिडो या आजपर्यंत त्यांच्या मोबाईल अॅप्लिकेशनवर कोणतेही दर लागू केले नाहीत. त्यामुळे गुरुवारी आझाद मैदानात कॅब, रिक्षा, टॅक्सीचालक पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आले. तेथे चालकांची सभा घेण्यात आली.
जर 30 सप्टेंबर 2025 पूर्वी आम्हाला आमच्या हक्कांचे दर नाही मिळाले तर सर्वजण आझाद मैदानात जमतील. त्यावेळी चालक महायुती विरोधात मतदान करण्याची शपथ घेतील असा ठराव करण्यात आला आहे. तत्पुर्वी जनजागृती करण्यासाठी वाहनांना ‘मा.मोदीजी सुनिये’ अशाप्रकारचे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत.