

लाडकी बहिण योजनेत २ कोटी ३३ लाख ६४ हजार महिला लाभार्थी होत्या. २ कोटी ४७ लाख आता लाभार्थी आहेत. याचा अर्थ लाभार्थी वाढले आहेत. त्यांच्या आयुष्यात हा आनंद राहणार आहे. २१०० रूपये देण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, याची काळजी आमचे सरकार घेईल, असे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
जन्म मृत्यू दाखले देण्याबाबत जो घोळ होतो तो निवारण करण्यासाठी अधिनियमात बदल करत आहे. जन्म व मृत्यूची नोंद एका वर्षात केली नसेल तर त्याची खातरजमा करावी. खातरजमा करताना दिलेल्या आदेशावर विहित फी भरल्यावर नोंद करता येत होती. त्यात सुधारणा केली आहे. यापुढे जन्म-मृत्यूची एका वर्षानंतर नोंदणी करायची असेल तर प्राधिकृत अधिकाऱ्याने अचूकतेची खात्री करावी, तसेच विलंब शुल्क आकारून नोंद करावी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले.
'शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,' या मागणीसाठी शेतकऱ्यांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे विरोधक विधानसभेत स्थगन प्रस्ताव १ वाजता मांडणार आहेत.
लाडकी बहिण योजनेवरून सभागृहात विरोधक आक्रमक झाले आहेत. कृषी सन्मान योजनेतील महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळणार का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. या दोन्ही योजना मिक्स करू नका, असे त्यांनी म्हटले आहे.
शालेय पोषण आहारात अंडी आणि केळी देण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार तमीळ सेलवन यांनी विधानसभेत केली आहे. काही दिवसांपुर्वी शालेय पोषण आहारातून अंडी गायब करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांनी सरकारवर मोठया प्रमाणात टिका केली होती. आता भाजप आमदारांनीच याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात गृह खात्याचे काम व पोलिसांसंदर्भात घटना या सांगतात की पोलीसांचे खच्चीकरण झाले आहे. काल चंद्रपुरात एका पोलिसाचा बळी गेला. हे स्पष्ट दर्शवते की, पोलिसांची लढण्याची क्षमता कमी झाली आहे, धाक कमी झाला आहे. राजकीय हस्तक्षेप व दबाव वाढला आहे. पोलीस ठाण्यात खुलेआम गोळीबार होतो. महाराष्ट्राचा पोलीस म्हणजे स्कॉटलंड बरोबर तुलना करायचो. आज ती स्थिती राहिलेली नाही. राजकीय लोकांचे पोलीस झाले आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानभवन परिसरात अनोखे आंदोलन केले. बनावट पनीर घेऊन विधीमंडळात त्यांनी प्रवेश केला.