महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज (दि. ८ जुलै) नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांची नड्डा यांच्यासोबतची ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुण्यात भेट घेतली होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा दिल्ली दौऱ्यात घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांसोबत ही रविंद्र चव्हाण यांनी केली चर्चा. संघटना वाढीसाठी गडकरी व नड्डांकडून चव्हाण यांनी घेतले मार्गदर्शन घेतले.
नड्डा यांच्यासोबतच्या भेटीनंतर चव्हाण यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची स्नेहभेट घेतली.या भेटीमध्ये महाराष्ट्रातील पक्ष संघटना आणखी बळकट करण्यासोबतच विविध विषयांवर चर्चा झाली. नड्डाजींसोबतच्या चर्चेतून नेहमीच एक नवीन ऊर्जा व दिशा मिळते, याचा आजही अनुभव आला, असेही त्यांनी नमूद केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ते नगरसेवक, आमदार, संपादक, मंत्री, पालकमंत्री, भाजपचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष ते आता प्रदेशाध्यक्ष असा चव्हाण यांचा राजकीय प्रवास आहे.२०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये चव्हाण यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आले नाही. त्यांच्याजागी ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांना संधी देण्यात आल्याने चव्हाण यांच्यावर पक्ष बांधणीसाठी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक निवडणुका झाल्यावर चव्हाण यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.