

"मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. मी सर्वांना उघड आव्हान देतो जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा," अशा शब्दांमध्ये भोजपुरी अभिनेते व भाजप नेते दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी हिंदी सक्ती वादावर मत व्यक्त केले. मीरा रोड येथील एका फास्ट फूड दुकानातील कर्मचाऱ्याला मराठी न बोलल्याबद्दल झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निरहुआ यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर थेट आव्हानात्मक भूमिका घेतली आहे.
वाराणसी येथे माध्यमांशी बोलताना दिनेश लाल यादव म्हणाले की, मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. मी सर्वांना उघड आव्हान देतो जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा. तुम्ही गरिबांना का लक्ष्य करता? प्रत्यक्षात हिंदीला विरोध करणारे लोक हे फुटीरतेचे राजकारण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. देशातील कोणत्याही भागात भाषेच्या नावावर द्वेष किंवा हिंसा होऊ नये. भारत हा विविध भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो, आणि या विविधतेतूनच एकता साधली जाते, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय जल्लोष साजरा करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेकडून शनिवारी सकाळी ११ वाजता वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे मराठी जनांचा विजय मेळावा होत आहे. उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत आहेत, हे या मेळाव्याचे मुख्य आकर्षण होय. मेळाव्यात फक्त उद्धव व राज ठाकरे या दोघांचीच भाषणे होणार असल्याचे समजते. पहिले भाषण कोण करणार याबाबत उत्सुकता आहे.
विजयी मेळाव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकाच मंचावर महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिकांचे पोस्टर सध्या मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. या पोस्टरवर कुठेचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट पक्षाचा झेंडा देखील नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. 'कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा' असं लिहिण्यात आलं आहे