

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: पहिले जागतिक दृकश्राव्य मनोरंजन समिट ( वेव्ह्स ) मुंबईमध्ये आयोजित केले जाणार आहे. यासंदर्भात दिल्लीमध्ये विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १ मे पासून या समिटचे आयोजन मुंबईतील जिओ कन्व्हेक्शन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मनोरंजन, तंत्रज्ञान आणि माध्यम क्षेत्रातील जवळपास १०० देशातील लोक यासाठी मुंबईत येणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबई सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्राकडे दिल्याबद्दल केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मुख्यमंत्र्यांनी मानले.
क्रिएटिव्ह इकॉनोमी ही सर्वात वेगाने वाढणारी आहे. एक जागतिक दर्जाचा मंच या समिटच्या माध्यमातून तयार होणार आहे आणि याचे आयोजन महाराष्ट्राला करायला मिळणं ही खूप मोठी संधी आहे, असे ते म्हणाले. या समिटचे नेहमीसाठी मुंबईतच आयोजन करावे, अशी विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे ते म्हणाले. या समिटसाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील सामंजस्य कराराची देवाण घेवाण करण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता शौनिक यांनी सामंजस्य कराराची देवाण घेवाण केली. या सत्राला विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त उपस्थित होते.
भारत सरकारने मुंबईमध्ये भारतीय सृजनशील तंत्रज्ञान संस्था (आयआयसीटी) उभारणार असल्याची घोषणा या अगोदरच केली आहे. त्यासाठी मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये जागा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आयआयटीच्या धरतीवर ही संस्था उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ३९८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याचे ते म्हणाले.