

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तिसरी यादी बुधवारी (दि.२३) जाहीर करण्यात आली असून या यादीमध्ये १३ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अमरावतीतून मंगेश पाटील,गोंदियातून सुरेश चौधरी, पुसदमधून अश्विन जयस्वाल, यांच्यासह तेरा उमेदवारांचा समावेश आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज (दि. २३) राष्ट्रवादीत प्रवेश केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी- भुदरगड विधानसभेचे माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांनी आज बुधवारी (दि.२३) मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने ३८ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर केली. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचले आहेत. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री प्रचाराला सुरूवात करणार आहेत.
सरकारी पदाच आव्हान मोठ असतं पण मी स्विकारण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे अमित ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेना सत्तेत असताना निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, मात्र मनसेची तशी स्थिती नाही, असेही अमित ठाकरे म्हणाले.
मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटला आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याने आमच्याकडे इन्कमिंग जास्त सुरू आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अमित ठाकरे तरूण नेतृत्व आहे, मनसेकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा, असेही राऊत म्हणाले.
उमेदवारी अर्ज भरण्याकरिता 24 ऑक्टोबरचा मुहूर्त साधण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यातून काँग्रेसला 105, उद्धव ठाकरे गटाला 95 आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 85 जागा देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात निर्माण झालेला वाद जवळपास शमला आहे.
पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार (दि. २२) पासून अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक उमेदवार गुरुवारचा गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधणार आहेत. भाजप, वंचित बहुजन आघाडीसह परिवर्तन महाशक्ती यांनीही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या आज (२३ ऑक्टोबर) जाहीर होणार आहेत. पाहा लाईव्ह अपडेट्स...