

Maharashtra assembly monsoon session 2025 :
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (दि.३०) पासून मुंबई येथे सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांसह सत्ताधारी आमदारही आक्रमक झाले. शिंदे शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी ही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पायऱ्यांवर आंदोलन केले.
विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला असला तरी त्यांच्याकडे कोणतेही ठोस मुद्दे नाहीत. त्यांनी पाठविल्या पत्राचा आकार गेल्या अधिवेशनापेक्षा वाढला असला तरी त्यांचे मुद्दे मात्र तेच तेच आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विरोधकांवर केली. या अधिवेशनात एकूण १२ विधेयके सादर होणार असून प्रलंबित असलेले एक विधेयक आणि संयुक्त समितीकडील विशेष जनसुरक्षा विधेयकावर देखील चर्चा होईल. त्याचबरोबर सहा अध्यादेश पटलावर ठेवले जातील. मराठी मुद्दा महत्वाचा आहे. पण हा मुद्दा विरोधकांनी पत्रात मांडताना व्याकरणाच्या अनेक चुका केल्या आहेत, असे सांगतानाच बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकल्यावर असे होणारच असा टोला फडणवीस यांनी लगावला. या बैठकीला नाराज असलेले भास्कर जाधव का आले नव्हते, असा सवाल फडणवीस यांनी करत त्यांची सही देखील पत्रावर नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.