विधानसभा महासंग्राम : दक्षिण मध्य मुंबईत तिरंगी लढती शक्य

Maharashtra Assembly elections 2024 | धारावीत पुनर्वसन प्रकल्पाच्या नाराजीचा महायुतीला फटका!
Maharashtra Assembly elections 2024
विधानसभा महासंग्राम : दक्षिण मध्य मुंबईत तिरंगी लढती शक्य file photo
Published on
Updated on
दक्षिण मध्य मुंबई : प्रमोद चुंचुवार/ सहकारी

Maharashtra Assembly elections 2024 : दक्षिण मध्य मुंबई (South Central Mumbai) लोकसभा मतदारसंघात माहीम, चेंबूर, सायन-कोळीवाडा, वडाळा, अणुशक्तीनगर आणि धारावी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी माहीम आणि वडाळा मतदारसंघांत मनसेची मते निर्णायक ठरणार आहेत. सायन-कोळीवाडा, चेंबूरमध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा विजयी होणे सहजसोपे नसून धारावीत पुनर्वसन प्रकल्पाच्या नाराजीचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदारसंघांत मनसे स्वतंत्र लढल्यास तिरंगी लढतीची शक्यता आहे.

माहीम

माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसे यांच्यात तिरंगी लढतीची शक्यता असून मनसेने रिंगणात उमेदवार उतरविल्यास महायुतीचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढू शकतात. लोकसभा निवडणुकीत दादर या पारंपरिक बालेकिल्ल्यातील मतदारांनी ठाकरे गटाऐवजी महायुतीला पसंती देत 13 हजारांहून अधिक मतांचे मताधिक्य दिले. विधानसभेतही याचीच पुनरावृत्ती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे स्वबळावर लढली तर या मतदारसंघातून नितीन सरदेसाई किंवा संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळू शकते. दोन्ही शिवसेनेच्या भांडणात मनसेला विजयाची लॉटरीही लागू शकते.

महाविकास आघाडीच्या वाटपात हा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) यांच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून माजी महापौर मिलिंद वैद्य, माजी आमदार विशाखा राऊत यांची नावे चर्चेत आहेत. महायुतीच्या वाटपात शिंदे हा मतदारसंघ सोडायला तयार होणार नाहीत. मात्र महायुतीत मनसे दाखल झाल्यास या मतदारसंघावर ते दावा करू शकतात. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

चेंबूर

चेंबूर विधानसभेत शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकणार असल्याची शक्यता असून मनसेनेही निवडणूक लढविल्यास तिरंगी लढतीत मराठी मतांच्या विभाजनामुळे ठाकरे गटाचे नुकसान होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अवघे 2 हजार 878 मताधिक्य मिळाल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. सध्या शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रकाश फातर्फेकर हे येथून आमदार आहेत. शिंदे गटाकडून तुकाराम काते की राहुल शेवाळे यांच्यापैकी कोण उमेदवार राहील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चेंबूर मतदारसंघात 35 ते 40 टक्के दलित मतदार असून हा दलित मतदारच निर्णायक आहे.

या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे दोनवेळा निवडून गेले होते. त्यामुळे काँग्रेसला हा विधानसभा मतदारसंघ हवा आहे. पण या मतदार संघात गेल्या 10 वर्षांपासून ठाकरेंचे आमदार असल्यामुळे ठाकरे हा मतदारसंघ सोडण्यास तयार होणार नाहीत. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. अणुशक्तीनगरमधून उमेदवारी मिळत नसल्यास चेंबूरमधून उमेदवारी मिळावी, अशी विनंती माजी आमदार तुकाराम काते यांनी पक्षाकडे केली आहे. अनूसूचित जाती समुदायातील असलेले माजी खासदार राहुल शेवाळेही या मतदारसंघातून शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. या मतदारसंघात शेवाळे अथवा कातेंपैकी कुणालाही उमेदवारी मिळाल्यास ठाकरेंसाठी मोठी कसोटी आहे.

सायन-कोळीवाडा

आजवर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 9 हजार 312 मतांचे मताधिक्य मिळाल्याने विद्यमान भाजप आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांच्यापुढे आव्हान उभे आहे. त्यांच्या जागी नव्या दक्षिण भारतीय उमेदवाराचा शोध भाजपतर्फे घेतला जात आहे. या मतदारसंघात दक्षिण भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा हे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. राजा हे दक्षिण भारतीय असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. 2019 प्रमाणे गणेश यादव यांनाही काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.

वडाळ्यात कोळंबकरांना नवव्यांदा आमदारकीचे वेध

वडाळा विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत होणार असून मराठी मतांच्या विभाजनाचा कुणाला लाभ होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील या विधानसभा मतदारसंघात महायुतीला 10 हजारांहून अधिक मते मिळाल्याने विद्यमान भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नवव्यांदा विजयाची खात्री महायुतीला वाटत आहे. शिवसेना (उबाठा) गटाकडून माजी महापौर श्रद्धा जाधव रिंगणात उतरण्याची शक्यता असून मनसेही आपला उमेदवार रिंगणात उतरविणार आहे.

मतदारसंघात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाला येथे मोठा जनाधार आहे. सध्या तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून (उबाठा) माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव या मतदारसंघातून आघाडीवर आहे.

अणुशक्तीनगर

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 24 हजार 278 मते अधिक मिळाल्याने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू आहे. 30 टक्क्यांहून अधिक असलेली मुस्लिम मते येथे निर्णायक आहेत. सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवाब मलिक हे येथून आमदार आहेत. महायुतीत या जागेवर शिवसेना (शिंदे) गटाने आपला दावा केला असून त्यांच्यातर्फे माजी आमदार तुकाराम काते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मलिक हे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे पवार गटाचा या जागेवर दावा आहे. त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसला तरच ही जागा मित्र पक्षांकडे जाऊ शकते. काँग्रेसकडे ही जागा आल्यास राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे आणि नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांच्या पसंतीच्या उमेदवाराला अग्रक्रम राहील.

धारावी

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाच्या आमदार वर्षा गायकवाड या आता खासदार झाल्याने त्यांच्या जागी त्यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची चिन्हे असून महायुतीचा उमेदवार कोण राहील याबाबत अद्यापही काहीही स्पष्टता नाही. धारावीच्या पुनर्विकासावरून सत्ताधार्‍यांविरोधात येथे नाराजी आहे. सध्या महायुतीत या जागेवर शिवसेना (शिंदे गट) दावा करीत असले तरी त्यांच्याकडे येथून रिंगणात उतरविण्यासाठी उमेदवार नाही. भाजपकडे दिव्या ढोले या उमेदवार असून त्यांचे या भागात चांगले कामही आहे. ही जागा शिंदे गट सोडायला तयार नसल्याने ढोले यांना वर्सोव्यात पाठविले जाऊ शकते. आम आदमी पक्षातर्फे संदीप कटके यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. या मतदारसंघात अनुसूचित जातीचे सुमारे 17 टक्के तर मुस्लिम मतदार सुमारे 34 टक्के असल्याने दलित-मुस्लिम मतदार निर्णायक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news