मुंबई : निवडून येण्याचे मेरिट हाच जागावाटपाचा निकष असे महाविकास आघाडीचे नेते सांगत असले तरी ११५ पेक्षा कमी जागा घेणार नाही, असा काँग्रेसचा यावेळी हट्ट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना १०० पेक्षा कमी जागा लढवाव्या लागतील, असे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. (MVA seat sharing)
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य, तसेच २०१९ मधील दुसऱ्या नंबरच्या जागा, यावरून अनेक जागांवर आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक वांद्रे येथील सोफिटेल हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि ठाकरे गटाचे संजय राऊत आदी हजर होते. गेल्या दोन दिवसांपासून आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत. गुरुवारी काँग्रेसचे आंदोलन असल्यामुळे काँग्रेसचे नेते या बैठकांना हजर नव्हते. पण ठाकरे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. शुक्रवारी तिन्ही पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. (MVA seat sharing)
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळाले त्या जागांवर या तिन्ही पक्षांची नजर आहे. उद्धव ठाकरे गटाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा निकष लावायला सांगितले आहे. शिवसेनेने तेव्हा ५६ जागा जिंकल्या होत्या. त्या जागा शिव सेनेला हव्याच आहेत. तसेच मुस्लिम आणि दलित मतदारांमुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांना मुस्लिमबहुल मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. त्या जागांवर त्यांचा दावा आहे. भाजपसोबत युती असताना शिवसेना मुस्लिमबहुल मतदारसंघ घेण्यास उत्सुक नसे. मात्र आता काँग्रेस आणि ठाकरे गटाचा या मतदारसंघांवरून संघर्ष सुरू आहे.
२०१९ च्या विधानसभा निकालाचा संदर्भ ठाकरे गट देत आहे. पण तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुसऱ्या नंबरवर होते. तसेच या मतदारसंघात ठाकरे गटाचे संघटन नाही, असा काँग्रेस आणि शरद पवार गटाचा मुद्दा आहे. तसेच उमेदवारही ठाकरे गटाकडे नाहीत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यावर बराच खल सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही नमते घेतले. पण काँग्रेसने जास्त जागा लढविल्या तर आघाडीची सत्ता हमखास येईल, असा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत.
शरद पवार गटाने ८० च्या आसपास जागा मागितल्या आहेत. पण शिवसेना ठाकरे गट १२५ आणि काँग्रेसने १३० जागांवर दावा केला आहे. जिंकून येण्याचे मेरिट हाच जागावाटपाचा निकष, असे आघाडीचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. पण प्रत्यक्षात बैठकीत अनेक जागांवर जोरदार दावे-प्रतिदावे केले जात आहेत.