

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Vidhan Sabha Election BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८ आणि १९ जुलैला मुंबईत भाजपची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे दोन्ही प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुढच्या काही दिवसात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यानंतर विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. येत्या १८ आणि १९ जुलैला भाजपची महत्वाची बैठक मुंबईत होत आहे. (Vidhan Sabha Election BJP)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत होत असलेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीसाठी रोड मॅप, विधानसभेतील जागावाटप आणि मित्रपक्षांवरही चर्चा होणार असल्याचे समजते.