

Maharashtra Assembly elections 2024 | भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात बोरिवली, कांदिवली, चारकोप, मालाड पश्चिम, मागाठाणे आणि दहिसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या लोकसभा मतदारसंघात मालाड वगळता अन्य पाचही मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. या सहापैकी एका मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने येणार असून भाजपच्या विद्यमान आमदारांच्या चार मतदारसंघांत पुन्हा एकदा भाजप निवडून येईल अशी स्थिती आहे.
गेल्या चार दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात भाजप विद्यमान आमदार सुनील राणे यांच्याऐवजी अन्य नेत्याला संधी देऊ शकते, अशी चर्चा आहे. या मतदारसंघात भाजपने उमेदवार बदलण्याची परंपरा निर्माण केली असून यावेळी भाजपतर्फे आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांची नावे चर्चेत आहेत. महाविकास आघाडीतून काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईची लोकसभा लढलेले भूषण पाटील यांचे नाव या मतदारसंघासाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये गुजराती व राजस्थानी मतदारांची संख्या सुमारे 40 ते 45 टक्के च्या घरात आहे. मराठी मतदार 20 ते 25 टक्के तर दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय व मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 25 ते 30 टक्क्यांच्या घरात आहे.
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपची स्थिती भक्कम असून महाविकास आघाडीत काँग्रेसकडे हा मतदारसंघ जाणार असल्याचे संकेत आहेत. भाजपचा विधानसभेत विजय निश्चित मानला जात असून काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. भातखळकर यांना तिसर्यांदा उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत शंका आहे. या मतदारसंघावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचाही दावा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरेकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले सलोख्याचे संबंध यामुळे भातखळकर यांचा पत्ता कट करून दरेकर यांना उमेदवारी मिळू शकते. ही शक्यता नाकारता येत नाही. दरेकर यांचा सुरुवातीला मागाठणे विधानसभेवर दावा असून आजही तो कायम आहे. मात्र या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट सोडण्यास तयार होणार नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीला या विधानसभेत तब्बल 70 हजारांचे मताधिक्य मिळाले. ही आकडेवारी लक्षात घेता या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मालाड पश्चिम विधानसभेत काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांच्या उमेदवारीबाबत आणि विजयाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना महायुतीत ही जागा भाजप की शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाईल, याबाबत स्पष्टता नाही. या मतदारसंघात सरासरी 30 टक्के मुस्लिम असून सुमारे 35 टक्के कोळी व अन्य मराठी मतदार आहेत.
गेल्या 15 वर्षांपासून या मतदारसंघातून काँग्रेसचे अस्लम शेख निवडून येत आहेत. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघात महाविकास आघाडीला बहुमत मिळाले पण अवघे 935 मतांचे. त्यामुळे मालाड विधानसभा काँग्रेसने राखली असली तरी महाविकास आघाडी काठावरच पास झाली आहे. दुसरीकडे शेख यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये, यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आग्रही आहेत. मालाड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी शिंदे गट अथवा भाजपकडून अस्लम शेख यांना उमेदवारीची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने शेख यांना उमेदवारी नाकारली तर त्यांच्यासाठी महायुतीचा मार्ग खुला राहणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा शेख यांना उमेदवारी दिल्यास भाजपकडून रमेश सिंग ठाकूर यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.
चारकोप विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मताधिक्य वाढीचा चढता आलेख मागील तीन विधानसभा निवडणुकीत दिसून आला आहे. या मतदारसंघातील मराठी मतदारांची संख्या मोठी असल्याने महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात सलग तीनवेळा भाजपने योगेश सागर यांनाच उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीतही महायुतीने या मतदारसंघात मविआवर तब्बल 79 हजार 96 मतांची आघाडी घेतल्यामुळे महायुतीच्या वाटपात हा मतदारसंघ भाजपच्याच पारड्यात पडणार हे निश्चित आहे. चारकोप विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे 40 टक्केपेक्षा जास्त मराठी मतदार असून गुजराती मतदारांची संख्या 20 ते 22 टक्के इतकी आहे. या मतदारसंघातून ठाकरेंनी आपला उमेदवार उतरवल्यास भाजपचे मताधिक्य कमी होऊ शकते.
मागाठाणे विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवारांमध्ये काट्याची लढत होणार आहे. मनसे स्वतंत्र लढल्यास तिरंगी लढत होऊन त्याचा फटका शिवसेना शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांचे नाव निश्चित असून ठाकरे गटातून मागाठाणे विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख तथा माजी नगरसेवक उद्देश पाटेकर, उपविभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक योगेश भोईर, माजी नगरसेवक संजय घाडी, शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांची नावे चर्चेत आहेत. मनसे महायुतीसोबत गेल्यास ठाकरे गटासाठी ही निवडणूक अवघड होईल; तर दुसरीकडे मनसेने स्वबळावर निवडणूक लढल्यास मराठी मतांचे विभाजन होऊन त्यांचा फटका शिंदे व ठाकरे गटाला बसू शकतो. या मतदारसंघात सलग दोनवेळा शिवसेना (शिंदे गट) उमेदवार आमदार प्रकाश सुर्वे विजयी झाले आहेत. सध्या शिंदे गटासोबत असलेले आमदार प्रकाश सुर्वे यांना मात्र 2024 ची निवडणूक कठीण जाणार असल्याचे दिसून येत आहे. हा मतदारसंघ मराठीबहुल झोपडपट्ट्या असलेला मतदारसंघ आहे. या मतदार संघात सर्वाधिक मतदार कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि त्यापाठोपाठ मराठवाड्यातील आहेत. सुर्वेंची मदार ही भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे.
दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या व विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर या रिंगणात उतरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या मतदारसंघात गुजराती व मारवाडी मतदार निर्णायक स्थितीत आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला 60 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने भाजपची स्थिती येथे भक्कम मानली जात आहे. माजी नगरसेवक तथा गेल्या काही महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून हत्या झालेल्या दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी व विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी या ठाकरे गटाच्या उमेदवार राहण्याची शक्यता आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येची त्यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे.