मुंबई ः महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठीचे मतदान पार पडल्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांनी आपापल्या मतदानोत्तर कल चाचण्यांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष जाहीर केले असून, बहुसंख्य मतदानोत्तर कल चाचण्यांनी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येत असल्याचे अंदाज वर्तविले आहेत. ‘भास्कर’, ‘इलेक्टोरल एज’ आणि ‘लोकपोल’ या तीन संस्थांनी महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तविला आहे. इतर सर्व संस्थांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे.
मध्य प्रदेशात ‘लाडली बहेना’ योजनेमुळे सरकारविरोधी नाराजीवर (अँटी इन्कम्बन्सी) मात करता आली. हीच योजना राज्यात ‘लाडकी बहीण’ या नावाने राबविणार्या सत्ताधार्यांना यामुळे आपण सत्तेत येऊ, असा वाटणारा विश्वास खरा ठरताना दिसत आहे. निवडणुकीनंतर प्रमुख 11 संस्थांनी आपापले निष्कर्ष जाहीर केले आहेत. यातील तीन संस्थांचा अपवाद वगळता 8 संस्थांनी राज्यात महायुतीच पुन्हा बहुमतासह सत्तेत येत असल्याचे अंदाज वर्तविले आहेत.
‘एक्झिट पोल’चे हे अंदाज पाहता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्याच्या दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दैनिक ‘भास्कर’ने केलेल्या पाहणीत महाविकास आणि महायुती दोन्ही स्पष्ट बहुमताच्या जवळ पोहोचत असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी सर्वच प्रमुख संस्थांनी काँग्रेस सत्तेत येत असल्याचे अंदाज वर्तविले होते. प्रत्यक्षात हे अंदाज साफ खोटे ठरवत तेथे भाजप सत्तेत आला. लोकसभेच्या वेळीही बहुसंख्य संस्थांनी वर्तविलेले ‘एक्झिट पोल’ चुकीचे ठरल्याचे दिसून आले होते. बहुसंख्य सर्वेक्षण संस्थांनी अपक्ष, छोट्या पक्षांचे आणि महाविकास व महायुती वगळून निवडून येणार्या आमदारांना इतर श्रेणीत टाकले आहे. या श्रेणीत काही संस्थांनी 10 ते 25 आमदार निवडून येतील, असे अंदाज वर्तविले आहेत. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळी या आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.