

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ४ जी कनेक्टिव्हिटी १०० टक्के पोहोचल्यानंतर आता राज्याची ५जी च्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
संपूर्ण राज्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी, आतापर्यंत अंदाजे १,६४,००० ४जी आणि ४०,००० ५जी बेस ट्रान्सीव्हर स्टेशन्स (बीटीएस) स्थापित करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. यामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांतील दूरसंचार सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी विशेषतः कोकण विभागातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्तारावर प्रकाश टाकला आणि सांगितले की, विविध जिल्ह्यांमध्ये ४जी आणि ५जी नेटवर्कची व्यापक उभारणी करण्यात आली आहे. त्यांनी माहिती दिली की, पालघर जिल्ह्यात ५,४६३ ४जी आणि १,६०९ ५जी बीटीएस, ठाणे जिल्ह्यात ६,७१० ४जी आणि १,९८९ ५जी बीटीएस, रायगड जिल्ह्यात २,९४० ४जी आणि ७९१ ५जी बीटीएस, रत्नागिरी जिल्ह्यात २,२९२ ४जी आणि ४६५ ५जी बीटीएस, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९७५ ४जी आणि २५६ ५जी बीटीएस स्थापित करण्यात आले आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया'च्या संकल्पनेनुसार, भारत सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, वेगवान आणि विश्वासार्ह डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास कटिबद्ध आहे. आगामी काळात ५जी नेटवर्कच्या पुढील विस्तारामुळे, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील डिजिटल सक्षमीकरण नवीन उंचीवर नेले जाईल.