

कोपरखैरणे (मुंबई) : महापे - शीळफाटा हा ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतून जाणारा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. चांगला विस्तीर्ण व सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता झाल्याने वाहनचालकाचे वेगावर नियंत्रण राहत नाही. अनेकदा वाहन चालकाच्या हलगर्जीपणाने रोज अनेक छोटे मोठे अपघात होत असतात. काही आठवड्यांपूर्वी वाहतूक नियंत्रित करताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना गुरुवारीही अशाच एका अपघातात एका व्यक्तीच्या पोटावरून कंटेनरसारखे अवजड वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत ठाणे-बेलापूर, शीव-पनवेल, उरण फाटा- जेएनपीटी हे महामार्ग आहेत तर या महामार्गाप्रमाणेच असणारा शीळ फाटा महापे हा एक मार्ग आहे. सहा पदरी रस्ता, योग्य त्या ठिकाणी उड्डाणपूल या मार्गावर असले तरी अपघाताचे प्रमाण कमी नाही. एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते खराब झाले असून या मार्गावरून कसेबसे मार्गक्रमण करून महापे-शीळ फाटा या सिमेंट काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर आले की वाहने सुसाट सुटतात. त्यातून रोज छोटे मोठे अपघात होत आहेत.
जेएनपीटी मार्गानंतर हा सर्वात व्यस्त मार्ग असून बहुतांश वाहतूक ही जड अवजड वाहनांची असते. बदलापूर, कल्याण, डोंबिवली एमआयडीसी ते मुंबई अंधेरी एमआयडीसी जोडणारा हा मार्ग आहे. याशिवाय नाशिक गुजरातकडे अवजड वाहने याच मार्गावरून जातात. एकंदरीत ही वाहतूक पाहता वाहतूक पोलीस विभागाने येथे महापे बिट चौकी स्थापन केली. मात्र अपुऱ्या मनुष्यबळाची ओरड सुरूच आहे. २४ जुलै रोजी वाहतूक नियंत्रण करीत असताना हायड्रा गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने गणेश पाटील या वाहतूक हवालदाराला धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना महापे उड्डाणपुलाखाली सकाळी साडेआकराच्या सुमारास घडली होती. या ठिकाणापासून काही अंतर असणाऱ्या एल अँड टी कंपनीसमोर असाच अपघात गुरुवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास झाला. गौरव येडगे या २९ वर्षीय युवकाचा या अपघातात मृत्यू झाला. यात कंटेनर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवत असताना स्कुटीवरून गौरव येडगे महापेकडे जात असताना त्याच्या स्कुटीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत तो रस्त्यावर पडला. मात्र तरीही कंटेनर चालकाने न थांबता त्याच्या अंगावरून गाडी पुढे नेली. यात त्याच्या पोटावरून गाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.