

मुंबई : महालक्ष्मी येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित नवीन उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. सदर उड्डाणपुलावर केबल-स्टेड पुलास आधार देण्यासाठी 78.5 मीटर उंचीचा पायलॉन (भव्य लोखंडी खांब) उभारण्यात येत आहे. त्याचे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. पायलॉन, पोहोच रस्ते तसेच सर्व अनुषंगिक कामे वेळेत पूर्ण करून 31 ऑक्टोबरपर्यंत उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
याबाबत बोलताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले, केबल-स्टेड पुलाच्या संरचनेतील पायलॉन हा अत्यंत महत्त्वाचा आणि भारवहन करणारा घटक आहे. त्यावर उड्डाणपुलाच्या डेकला आधार देणाऱ्या केबल्स ताणलेल्या असतात. प्रस्तावित पुलासाठी 78.5 मीटर उंचीचा पायलॉन उभारण्यात येत असून, ही उंची आणि त्याची रचना अभियांत्रिकीच्या दृष्टीने विशेष आव्हानात्मक आहे.
पायलॉनची रचना प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामध्ये उच्च दर्जाचे काँक्रिट व मजबूत पोलादी घटकांचा समावेश आहे. वारा, भूकंप, वाहतुकीचा भार तसेच दीर्घकालीन वापर यांचा विचार करून पायलॉनची स्थिरता व टिकाऊपणा सुनिश्चित करण्यात आला आहे. पायलॉन उभारणीसाठी अत्याधुनिक व पायलॉनच्या उंचीपेक्षा अधिक उंच असणारी क्रेन कार्यस्थळी स्थापित करण्यात आली आहे.
या क्रेनच्या सहाय्याने टप्प्याटप्प्याने पायलॉनची उभारणी केली जात आहे. सद्यस्थितीत पायलॉन उभारणीचे सुमारे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे नियोजित वेळापत्रकानुसार सुरु आहेत. उर्वरित पायलॉन उभारणीसह संलग्न कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण केली जातील.
रेल्वे रूळांवरील पहिला केबल आधारित पूल
केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा पूल हा रेल्वे रूळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी 803 मीटर तर रुंदी 17.2 मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी 23.01 मीटर इतकी आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामात येणाऱ्या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी महानगरपालिकेने उड्डाणपुलाच्या संरेखनात योग्य ते बदल केले आहेत.