

मुंबई : एसटीच्या ताफ्यात लवकरच तब्बल 8000 स्वमालकीच्या नव्या गाड्या दाखल होणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बाब असली तरी एसटीच्या नव्या गाड्यांवर चालक-वाहक मात्र कंत्राटी असणार आहेत. त्यामुळे एसटीसमोर हे मोठे आव्हान ठरणार आहे.
एसटीच्या गाड्यांचा ताफा वाढत असून येत्या दोन, तीन वर्षात नवीन बसेसचा आकडा 24 हजारांपलीकडे जाणार असल्याचे सांगण्यात येते. कधीकाळी एसटीकडे सर्वात जास्त म्हणजेच 18,800 गाड्या होत्या. त्यात कमी होत तो आकडा 14000 पर्यंत आला. पण पण आता मात्र हा अकडा 24,000 पर्यंत नेण्याचे नियोजन सुरू आहे.
स्वमालकीच्या 3000 गाड्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. 5000 स्वमालकीच्या नवीन गाड्यांची निविदा अंतिम टप्प्यात असून या डिसेंबर महिन्यात त्याचे प्रिबीड करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे 5000 जुन्या गाड्यांचे एलएनजीमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.
5150 भाडे तत्त्वावरवरील इलेक्ट्रिक बसेसपैकी 559 बस ताफ्यात दाखल झाल्या असून येत्या काही वर्षात अजून काही गाड्या टप्प्याटप्प्याने दाखल होतील. इलेक्ट्रिक बसेस या भाडे तत्त्वावरवरील असल्यातरी त्यावर चालक खासगी कंपनीचा असला तरी वाहक व अन्य कर्मचारी कायम सेवेतील लागणार आहेत.
नव्या गाड्या येत असल्या तरी मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा हे मोठे आव्हान आहे. सध्या शासनाने 16500 चालक व 1100 यांत्रिकी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास परवानगी दिली आहे. हे कंत्राट कर्मचारी तीन वर्षांसाठी आहेत. भविष्यातील धोके पाहता शासनाने कायम स्वरूपी कर्मचारी भरती करण्यास मंजुरी देण्याची मागणी एसटीतील कामगार संघटनांनी केली आहे.
चालक हा सर्वात महत्त्वाचा घटक असून 28,257 चालकांची मंजुरी असताना एसटीमध्ये सध्या 21510 चालक आहेत.27,413 वाहकांची मंजुरी दिली असताना सध्या 23,683 वाहक आहेत. सध्या सुरू असलेल्या फेऱ्यांचा विचार केला तर कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. यामुळे चालक-वाहकांवर दाब, डबल ड्युटी, आणि सेवांची गुणवत्ता घटण्याचा धोका कायम आहे. सध्या एसटीत चलनात असलेल्या स्वमालकीच्या 15085 गाड्यांवर चालक व वाहक यांची संख्या कमी पडत आहे.
सरकारने 2004 मध्ये 21,353 कायम स्वरुपी प्रशासकीय कर्मचारी असावेत अशी मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्षात मात्र 12,709 इतकेच कर्मचारी आहेत. त्याच मंजुरीमध्ये 27,074 कार्यशाळा कर्मचारी असावेत अशी मंजुरी दिली असताना प्रत्यक्षात मात्र फक्त 15,591 कर्मचारी आहेत.
चणे आहेत, पण दात नाहीत ! - सरकारने एसटीला गाड्या दिल्या असल्या तरी त्याला लागणारे मनुष्यबाळ कंत्राटी दिलेले असून त्याचे दूरगामी धोके पाहता हे एसटी समोर मोठे आव्हान ठरणार आहे. म्हणजेच चणे दिले, पण त्याला चांगले दातच नसले तर त्याचा उपयोग काय? तब्बल 76 वर्षे पूर्ण केलेल्या एसटीत व्यवस्थापन कुचकामी ठरले आहे.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस