

मुंबई : पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने महायुतीच्या आमदारांसह नगरसेवकांना मोठा विकास निधी उपलब्ध करून दिल्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक पवित्रा घेणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महापालिका प्रशासनाने विरोधी पक्षाच्या आमदारांसह माजी नगरसेवकांना निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे महापालिका विरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात येणार आहे. याची दिशा ठरवण्यासाठी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचे समजते.
मुंबई महानगरपालिका विसर्जित झाल्यानंतर मुंबईतील २२७ प्रभागातील किरकोळ कामांना खिळ बसली आहे. पण मुंबईतील पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला हाताशी धरून, स्वतःच्या आमदार व माजी नगरसेवकांना महापालिकेच्या तिजोरीतून मोठा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विरोधी पक्षाचे आमदार असलेल्या विधानसभेसह माजी नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये लाखो नागरिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व समाजवादी पार्टीमार्फत मुंबईत मोठे आंदोलन छेडले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पुढील आठवड्यात आघाडीतील सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये केवळ महापालिका प्रशासनालाच नाही तर राज्य सरकारला ही कोंडीत पकडण्यात येणार असल्याचे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे.
मुंबई शहर व उपनगरात शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसचे १३ आमदार आहेत. त्याशिवाय ६० ते ७० प्रभागांमध्ये मा विकास आघाडीचे माजी नगरसेवक कार्यरत आहेत. त्यामुळे आमदारांसह माजी नगरसेवकांना महाविकास आघाडीच्या आमदार व माजी नगरसेवकांप्रमाणे निधी मिळायलाच हवा, यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन सुरुवातीला मागणी करण्यात येणार आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास जोरदार निदर्शने, मोर्चा काढला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
पहिला टप्पा - आयुक्त व प्रशासनाला निधी देण्यासाठी विनंती करणे
दुसरा टप्पा - विधानसभा मतदारसंघ व प्रभागांमध्ये जाऊन सरकारचे कारनामे उघड करणे
तिसरा टप्पा - वरिष्ठ नेत्यांमार्फत आयुक्तांची भेट घेणे
चौथा टप्पा - विभाग कार्यालयाबाहेर निदर्शने व मोर्चा
पाचवा टप्पा - मुंबई महापालिका मुख्यालय व मंत्रालयावर भव्य मोर्चा