मुंबई : वरळी येथील 30 बीडीडी चाळींच्या रहिवाशांसाठी संगणकीय सोडत 2 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. वरळी बीडीडीच्या 30 चाळींची संगणकीय सोडत 28 जानेवारीला आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे म्हाडाने सांगितले आहे.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे बीडीडी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे 86 एकरवर वसलेल्या सुमारे 207 चाळींचा समावेश आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये 2 हजार 560 निवासी व अनिवासी गाळे असून 14 पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत.
नायगाव (दादर) येथे 3 हजार 344 निवासी व अनिवासी गाळे 20 पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. येत्या एप्रिलपर्यंत 3 हजार 666 रहिवासी नव्या घरांमध्ये जाणार आहेत. यात वरळीतील 1 हजार 708 रहिवाशांचा समावेश आहे.