मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जी-२० परिषदेच्या डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुपची दुसरी महत्त्वपूर्ण मिटिंग शहरात आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवरील सुमारे १५ हजार झाडांवर एलईडी लाईट्स लावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या एलईडी लाईट्सचा झाडांवर विपरित परिणाम होईल आणि या झाडांवर राहत असलेले पक्षी विचलित होतील, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. परंतु, झाडांवर बसविण्यात येणारे एलईडी लाईट्स झिरो लक्स लेव्हलचे (अतिशय मंद प्रकाश) असून बाहेर ऊर्जा उत्सर्जित करत नाहीत, असा दावा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केला आहे.
जी-२० परिषदेच्या डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुपची दुसरी बैठक २३ ते २५ मे दरम्यान मुंबईत होत असून, वेगवेगळ्या
देशाचे सुमारे १२० प्रतिनिधी मुंबईत येत आहेत. हे प्रतिनिधी ज्या रस्त्यावरून जातील त्या म्हणजेच मुंबई विमानतळ ते ताज हॉटेल, बीकेसी, ताज लँड्स एन्ड, जुहू बीच आणि वरळी या रस्त्यांवरील झाडांवर हे लाईट्स बसविले जाणार आहेत. त्यासाठी झाडांना खिळे मारले जाणार असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे केवळ लाईट्स नव्हे तर या खिळ्यांचे घावही या झाडांना आता सोसावे लागणार आहेत.
एका पर्यावरणतज्ज्ञाने सांगितले, की लाईट्स लावले तर रात्रीच्या वेळी झाडांचे नैसर्गिक सौंदर्य बाधित होईल. तसेच हे लाईट्स ऊर्जा उत्सर्जित करतील. त्याचा झाडांवर विपरित परिणाम होणे अटळ आहे. लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्येही झाडांवर लाईट्स लावले जातात. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र ) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कायदा १९७५ नुसार असे करण्यास मनाई करण्यात आली आहे. महापालिका मात्र हा कायदा मोडून झाडांच्या फांद्यांवर एलईडी लाईट्स बसवण्यास निघाली आहे. शिवाय हे लाईट्स या झाडांवर रोज रात्री कायमच ठेवले जाणार आहेत. झाडांवर बऱ्याच प्रकारचे पक्षी राहतात. लाईट्स लावले तर ते विचलित होतील. वटवाघूळ, घुबड यासारख्या पक्षांवर त्याचा जास्त परिणाम होईल. लाईट्स लावण्याचा निर्णय रद्द करायला हवा. पर्यावरण आणि सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी जे लोक एकत्र येत आहेत ते या महत्त्वाच्या विषयाकडेच दुर्लक्ष करत आहेत, अशी पर्यावरणवाद्यांची तक्रार आहे.
संकटात असताना झाडेही अल्ट्रॉसॉनिक रेंजमध्ये रडतात, मदत मागतात असा शोध इस्त्रायलच्या तेल अविव विद्यापीठाच्या संशोधकांनी लावला आहे. झाडांचा हा आवाज पकडण्यात या संशोधकांना यश आले आहे. लाईट्स लावल्यावर निश्चितच झाडांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. त्यामुळे या झाडांच्या मदतीची याचना मुंबई महापालिका ऐकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.