विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार

Congress
Congress

मुंबई:   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या सहकार्‍यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे 45 सदस्य असलेला काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा विरोधी पक्ष बनला आहे.

शिवसेनेतील बंडाळीनंतर वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाले. त्यावेळी संख्याबळाच्या आधारे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे तर विधान परिषदेतील पद ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेले. विधानसभेत 53 आमदारांसह राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष ठरला. तर शिवसेनेतील बंडाळीचे लोण विधान परिषदेत न पोहोचल्याने 11 आमदारांसह तिथले विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटातील अंबादास दानवे यांच्याकडे गेले. आता राष्ट्रवादीतील बंडाळीमुळे ही सर्व समीकरणे बदलली आहे. विधानसभेत 45 आमदारांसह काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेतील फेरबदल

दरम्यान, अजित पवारांच्या बंडाळीने विधान परिषदेतील संख्याबळात बदल होण्याची शक्यता आहे. सध्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी नऊ आमदार आहेत. अजित पवारांसोबत परिषदेतील काही आमदार गेल्याने राष्ट्रवादीची संख्या खाली येणार आहे.

चव्हाण, थोरात, पटोलेंची नावे आघाडीवर

काँग्रेसमधून विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत आतापासूनच तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तीन नेत्यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news