

Mumbai Thane Kalyan Dombivali Rains Laxmipujan 2025
मुंबई : ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली परिसरात पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगरात मंगळवारी संध्याकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर वाढला आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाने अनपेक्षित हजेरी लावल्यामुळे लक्ष्मीपुजनाच्या उत्साहावर पाणी पडले.
राज्यभरात दिवाळीचा उत्साह असतानाच मंगळवारी पुन्हा एकदा पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये हजेरी लावली. संध्याकाळी लक्ष्मीपुजनाची तयारी सुरू असताना आकाशात अक्षरश: ढग दाटून आले. विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस असे चित्र मुंबई महानगर क्षेत्रातील बहुतांशी भागात दिसत होते. दादर, ठाणे, कल्याण- डोंबिवली अशा विविध भागांमध्ये पावसाने झोडपले.
मात्र, या पावसामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. बाजारात खरेदीसाठी आलेल्यांची तारांबळ उडाली. रांगोळ्या, किल्ले, कंदील आणि सजावटीचे साहित्य भिजल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. अनेक ठिकाणी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दिवाळीची सुट्टी लागल्यापासून बच्चेकंपनीने किल्ले उभारणी केली आहे. मात्र पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे बच्चेकंपनीची सर्व मेहनत पाण्यात गेली. अनेकांनी तातडीने किल्ले झाकले. मात्र तोपर्यंत पावसाने किल्ले साफ धुतले होते.
बदलापूरमध्ये दुकानात शिरले पाणी
उल्हासनग, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या भागातही जोरदार पाऊस पडला. बदलापूर पूर्वेतील काही दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. तर बदलापूर- अंबरनाथ मार्गावरही पाणी साठल्याने वाहतूक मंदावली.
गोव्यातही पावसाची हजेरी
गोव्यात विजेच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी गेले दोन दिवस जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी पाऊस पडला. पणजीत काही ठिकाणी फक्त विजांचा गडगडाट ऐकायला आला मात्र पावसाच्या सरी कोसळल्या नाहीत. गोव्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे.