

मुंबई : मराठा समाजाला कुणबी जातीत समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय होणार आहे, असा आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. तसेच, ओबीसीचे आरक्षण संपवण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोठी भूमिका असल्याचा गंभीर आरोपही हाके यांनी केला आहे. ‘पुढारी न्युज’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हाके यांनी मराठा आरक्षणाचा सरकारने काढलेला जिआरवर आपले मत मांडत याचा विरोध केला.
जीआर फाडला, पवारांवर थेट हल्लाबोल
यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की आम्ही फक्त शरद पवार यांचाच निषेध करत नाही तर ज्या मुख्यमंत्र्यांनी हा जिआर काढला आहे. त्यांचाही निषेध करत आहे. राज्य सरकारने काढलेला मराठा-कुणबी आरक्षणाचा जीआर (GR) जाहीरपणे आम्ही फाडून टाकला. ‘मराठा समाज कुणबीत आल्यास बारा बलुतेदारांचे काय होणार?' असा प्रश्नही त्यांनी विचारला. 'बारामतीमुळे ओबीसींचे आरक्षण संपले आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा या निर्णयात मोठा वाटा असल्याचे दिसते', असेही ते म्हणाले.
आरक्षण देण्याचा सरकारला अधिकार नाही, आयोगाला आहे'
मराठा समाजाला कुणबीत टाकण्याचा अधिकार सरकारला नसून तो केवळ मागासवर्ग आयोगाला आहे, असे हाके यांनी ठामपणे सांगितले. 'चार वेगवेगळ्या मागासवर्ग आयोगांनी मराठा समाज मागासलेला नाही, असा अहवाल दिला आहे', असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. 'अॅफिडेविटवर जातीचे प्रमाणपत्र देणे ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. यातून ओबीसींचे संपूर्ण आरक्षण संपवण्याचा हा कट आहे', असा आरोपही त्यांनी केला.
मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन जात वर्चस्वाची भावना असणारे
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावरही हाके यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'जरांगे यांच्या आंदोलनामध्ये जातवर्चस्वाची भावना आहे. त्यांनी आपल्या मंचावर कधीही मागासवर्गीय महापुरुषांचे फोटो लावले नाहीत. या आंदोलनाला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा आहे', असा गंभीर आरोपही त्यांनी केला. 'जे खरे आर्थिक मागास आहेत त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस (EWS) हा स्वतंत्र प्रवर्ग आहे. मराठा गरीब झाला म्हणून त्याने कधीही बलुतेदारी स्वीकारली नाही, पण आम्ही जन्माने ओबीसी झालो म्हणून आम्हाला समाजात कायमच दुय्यम वागणूक मिळाली आहे', असे सांगून त्यांनी संविधानाचा मूळ अर्थ समजून घेण्याची गरज व्यक्त केली.