

मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी)ने रविवारी (दि.27) रोजी इयत्ता तिसरी ते दहावी या इयत्तांसाठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम 2025 चा प्रस्तावित मसुदा जाहीर केला. यात पहिली व दुसर्या भाषेसंदर्भातील धोरणाचा समावेश आहे, मात्र तिसर्या भाषेचा समावेश, तिचे माध्यम, स्वरूप यासंदर्भात कोणताही स्पष्टता यात नाही.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या दिशानिर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या या नव्या मसुद्यावर राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, पालक, अधिकारी, संघटना आणि समाजातील इतर घटकांनी अभिप्राय द्यावा, असे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
इयत्ता तिसरी ते दहावी या इयत्तांसाठी या मसुद्यात एकूण 20 विषयांचा समावेश असून, मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांचा अभ्यासक्रम त्यात आहे. याशिवाय समाजातील व्यक्ती, आपल्या सभोवतालचे जग, संरक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, व्यावसायिक शिक्षण अशा विविध नवकल्पनांसह विषय रचनेत बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. विशेषतः इयत्ता नववीसाठी ‘समाजातील व्यक्ती’ आणि दहावीमध्ये ‘पर्यावरण’ या दोन
तिसरी ते पाचवीसाठी ‘परिसर अभ्यास’ या पारंपरिक विषयाऐवजी आता ‘आपल्या सभोवतालचे जग’ या नावाने दोन भागांमध्ये (भाग 1 विज्ञान व भूगोल, भाग 2 इतिहास व नागरिकशास्त्र) विषय मांडणी केली गेली आहे. तसेच वाहतूक सुरक्षा, नागरी संरक्षण आणि समाजसेवा यांसारखे समकालीन विषयही नव्या अभ्यासक्रमात अंतर्भूत आहेत.
प्रस्तावित मसुद्यात तिसर्या भाषेचा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक डॉ. राहुल रेखावार यांनी दिली. सध्या प्रथम व द्वितीय भाषांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, तिसरी भाषा अभ्यासक्रमाचा समावेश समितीच्या शिफारशी व शासनाच्या अंतिम निर्णयानंतरच केला जाईल. राज्य शासनाने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण धोरण अंमलबजावणी समिती नेमली असून, तिच्या शिफारशींचा विचार करून तिसर्या भाषेचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तोपर्यंत सध्याची अभ्यासक्रम पद्धतीच सुरू राहील, असेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. हा मसुदा एससीईआरटीच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर 28 जुलैपासून उपलब्ध असून, 27 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अभिप्राय नोंदवता येणार आहे. अभिप्राय देताना विषय, इयत्ता, मूळ मजकूर, अपेक्षित बदल, कारण इत्यादी तपशील सविस्तर नमूद करावेत, अशी विनंतीही परिषदेने केली आहे.