

मुंबई ः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)ने इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रम, विषयनिहाय आणलेल्या नव्या वेळापत्रकात हिंदीसह तिसर्या भाषेचा समावेश केल्याने आता पुन्हा एकदा नव्याने वादाची ठिणगी पडली आहे. शिक्षण विभागाने स्पष्टपणे ‘हिंदी सक्ती नाही, तिसरी भाषा’ असे वारंवार सांगितले जात असले तरी, एससीईआरटीच्या या वेळापत्रकात हिंदी अथवा तिसर्या भाषेचे वेळापत्रक प्रत्यक्षात दिले असले तरी बहुतांश शाळांना आता हिंदी शिकवावीच लागणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलांना बाल्यावस्थेपासून बहुभाषिक शिक्षण मिळावे हा उद्देश असला तरी राज्यात मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला जातो. मात्र, एससीईआरटीच्या 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बुधवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात इयत्ता पहिलीसाठी आठवड्याला दोन तास आणि दुसरीसाठी तीन तास हिंदी अथवा ‘तिसर्या भाष’साठी राखून ठेवण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील बहुतांश शाळांत प्रामुख्याने तिसरी भाषा म्हणून हिंदीच शिकवली जाण्याची शक्यता आहे.
दोन भाषांचा कालावधी तीन भाषांत विभागला आहे. म्हणजेच अन्य दोन भाषांच्या वेळापत्रकावर अन्याय आहे. शिवाय हिंदी कोणीही शिकवू शकतो हेही शालेय शिक्षण विभागाने गृहीत धरले आहे.
एससीईआरटीच्या या आदेशामुळे अनेक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंग्रजी, मराठी, गणित, कलाशिक्षण या मुख्य विषयांसोबतच आता पहिल्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांना अतिरिक्त तिसर्या विषयाचा ताण सहन करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांवर कोणतीही भाषा सक्ती केली जाणार नाही. परंतु नवीन वेळापत्रक व विषय योजना यामुळे प्रत्यक्षात तशी सक्ती होणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
भाषा 1 (मातृभाषा), भाषा 2 (इंग्रजी), भाषा 3 (इतर).
आठवड्याचे 6 दिवस, रोज 5 तास म्हणजेच साप्ताहिक 30 तासिका.
भाषा 1 : मराठी (किंवा स्थानिक मातृभाषा), भाषा 2 : इंग्रजी, भाषा 3 : हिंदी (किंवा इतर), गणित, कला शिक्षण, आरोग्य/ शारीरिक शिक्षण, कार्य शिक्षण.