मुंबई : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ आणि वाद हे काही नवे नाही. दरवर्षीच याची प्रचिती येत असते. यंदा हे मंडळ चर्चेत आले आहे ते दर्शन रांगेवरून. दर्शनासाठी सामान्य नागरिक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) असलेल्या वेगळ्या रांगांमुळे मानवाधिकार आयोगाने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला नोटीस बजावली आहे. दर्शन व्यवस्थेतील हा भेदभाव का, अशी विचारणा करत याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
देशभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे गणेशोत्सवात लालबागमध्ये कायम प्रचंड गर्दी असते. भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. मंडळातर्फे अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि अन्य सामान्य गणेशभक्तांसाठी स्वतंत्र रांगा असतात. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या रांगेतून अनेकांना काही मिनिटांतच लालबागच्या राजाचे दर्शन मिळते. यामुळे अन्य भाविकांचा अपमान होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. लालबागच्या राजाच्या दर्शन व्यवस्थेविरोधात त्यामुळे अॅड. आशीष राय आणि पंकज मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मानवाधिकार आयोगाने या तक्रारीची दखल घेत मंडळाला नोटीस बजावली आहे. तसेच, राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलिस आयुक्त, मुंबई महानगरपालिक आयुक्त यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. मंडळाने जबाब व स्पष्टीकरण सहा आठवड्यांत लेखी स्वरूपात सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
गणेशोत्सव हा लोकउत्सव असल्याने दर्शन सर्वांसाठी समान आणि सुलभ असावे. दर्शन व्यवस्थेत भेदभाव टाळावा आणि सामान्य भाविकांना न्याय द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. या प्रकरणी राय व मिश्रा यांनी 22 सप्टेंबर 2023 व 14 सप्टेंबर 2024 रोजी तक्रारी करूनही राज्य प्रशासन व पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाही, याकडे तक्रारदारांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे.