

मुंबई : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील लाखो महिलांना आनंदाची बातमी मिळाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा सन्मान निधी (रु. १५००) थेट जमा केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
रक्षाबंधनासारख्या खास सणाच्या पूर्वसंध्येला हा निधी मिळणार असल्याने महिलांमध्ये विशेष उत्साह आहे. या निधीमुळे अनेक महिलांना घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तसेच सणासाठी आवश्यक खरेदी करता येणार आहे. यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यावर ८ ऑगस्ट रोजी लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा होणार आहे.
या बाबत महिला व बालकल्यांण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स वर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे अनेक बहिंणींना रक्षाबंधनासाठी सरकारकडून खुषखबर मिळाली आहे. अनेक बहिणीचा सण गोड होणार आहे.
या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र आहेत. लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात.