

Ladki Bahin Yojana
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील ११८३ सरकारी कर्मचारी महिलांनी पात्रता नसताना गैरप्रकाराने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांना महिला बाल विकास विभागाने दणका दिला असून त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत. तसेच या महिलांना सरकारकडून होणारी वेतनवाढही थांबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांचे सशक्तीकरण व्हावे, यासाठी राज्य शासनाने जून २०२४ पासून लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून गरीब व निराधार महिलांना सरकारकडून दरमहिन्याला १५०० रूपयांची मदत दिली जाते. मात्र या योजनेस पात्र नसलेल्या आर्थिकदृष्ट्या सशक्त महिलांनी गैरप्रकाराने या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील सरकारी कर्मचारी असलेल्या ११८३ महिलांनी बनावट कागदपत्रे दाखवून या योजनेचा लाभ घेतला असून शासनाकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. महिला बाल विकास विभागाकडून या महिलांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहे. शासनाकडून भरगच्च पगार मिळूनही योजनेचा लाभ घेतल्याने त्यांची शासनाकडून होणारी वेतनवाढही थांबविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.