

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा खर्च 43 हजार कोटींच्या वर पोहोचला आहे. त्यामुळे राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पातील सर्वात मोठ्या खर्चांपैकी ही एक योजना ठरली आहे.
महिला व बाल विकास विभागाने माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र घाडगे यांना ही माहिती दिली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एप्रिल 2025 मध्ये सर्वाधिक सुमारे 2.47 कोटी महिला लाभार्थी ठरल्या आहेत. मात्र जून 2025 पर्यंत लाभार्थी आणि वितरित रकमेची संख्या सुमारे 9 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राज्याची सुमारे 340 कोटी 42 लाख रुपयांची बचत झाली आहे.
जुलै 2024 ते जून 2025 या सुरुवातीच्या महिन्यांत मोठे पेमेंट झाले. कारण नव्या अर्जदारांचे थकित देयक क्लीअर करण्यात आले. ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वाधिक 7 हजार 419 कोटी इतका निधी वितरित झाला. यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचा संयुक्त हप्ता समाविष्ट होता. हा हप्ता विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच देण्यात आला.
पहिल्या वर्षी झालेला 43,045.06 कोटींचा खर्च 2024-25 साठीच्या सुधारित अंदाज 33,433 कोटींपेक्षा जास्त आहे. 2025-26 च्या अर्थसंकल्पातील प्रमुख विभागांच्या तुलनेत लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात मोठ्या खर्चाच्या योजनांपैकी एक ठरली आहे.
आर्थिक अंदाज
वित्त वर्ष 2025-26 साठी सरकारने या योजनेसाठी 36 हजार कोटी इतका निधी ठेवला आहे. तो राज्याच्या एकूण महसूल उत्पन्नाच्या सुमारे 6 टक्के आहे. मात्र, पहिल्या वर्षातील सरासरी मासिक खर्च 3 हजार 587 कोटी इतका होता.
लाभार्थ्यांची संख्या एप्रिल 2025 च्या 2.48 कोटी पातळीवर कायम राहिली, तर वार्षिक खर्च 44 हजार 640 कोटी पर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता घाडगे यांनी व्यक्त केली.