

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे अखंडपणे सुरूच राहणार असून योग्यवेळी या योजनेच्या निधीत आम्ही वाढ करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या बहिणींना दिली.
मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधत मुख्यमंत्री म्हणाले, हा केवळ राखीचा धागा नाही, तर प्रेमाचा धागा आहे. या धाग्यातून भाऊ-बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो. मात्र, आता मी माझ्या बहिणीला इतके सक्षम बनवेन की ती स्वतःचेच नव्हे, तर कुटुंबाचेही रक्षण करू शकेल. महिलांना अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवल्याने देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. महिलांच्या 50 टक्के सहभागाशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य नाही, असे सांगून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
मी या कार्यक्रमाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून आलो आहे. ज्याच्यामागे एवढ्या बहिणींचे साकडे, त्याचे कोण काय करू शकेल वाकडे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहातील महिलांनी उत्स्फूर्त दाद दिली. अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षड्यंत्रं रचली, शिव्याशाप दिला, त्रास दिला, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या म्हणून आमचे काहीच वाकडे झाले नाही. आम्ही पुन्हा तुमच्या आशीर्वादाने
सत्तेवर आलो, असे ऋणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.
‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ महिलांना देत असताना काही भाऊ हुशार निघाले. त्यांनी बहिणीच्या नावेच लाभ घेण्यास सुरुवात केली. काही तर इतके हुशार होते की, त्यांनी चक्क महिलेच्याऐवजी मोटारसायकलचाच फोटो टाकला होता. अशा हुशार भावांना आम्ही हुडकून काढत त्यांचे पैसे थांबविले आहेत. मात्र अशा प्रकरणांत जर एखादी महिला पात्र असेल तर जिल्हाधिकारी अशा प्रत्येक प्रकरणाची पडताळणी करतील. पात्र महिलेला तिचा लाभ निश्चितच देण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही बहिणीला लाभापासून वंचित ठेवायचे नसून जे घुसखोरी करीत आहेत,त्यांना या योजनेतून बाहेर काढायचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.
महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या अनेक योजना सुरू केल्या. ‘मुद्रा योजने’च्या लाभार्थ्यांमध्ये 60 टक्के महिला आहेत. यामुळे लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली आहे.‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रात गेल्या वर्षी 25 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आणि यावर्षीही 25 लाख महिलांना, तर राज्यात एकूण एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.