

Women Welfare Scheme
मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत मे महिन्यातील रक्कम लवकरच लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी एकूण 419.30 कोटींचा निधी वितरित करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी मान्यता दिली आहे. हा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरला जाईल, असे विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.
या योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गेल्या महिन्यात एकूण 3 हजार 960 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर केला आहे. त्यातील 410 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचे पैसे देण्यासाठी वापरले जाणार आहेत. वित्त विभागाने घालून दिलेल्या कार्यप्रणालीनुसार हा निधी महिला व बालविकास विभागाला अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आल्याचे यासंदर्भातील शासन निर्णयात नमूद केले आहे.