

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
लाडकी बहीण योजनेच्या नावाने ६५ महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार मानखुर्द परिसरात उघडकीस आला असून या महिलांकडून घेतलेल्या कागदपत्रांवरून संबंधित आरोपींनी एका खाजगी वित्त पुरवठा कंपनीत आयफोनसाठी अर्ज करून सुमारे २० लाखांच्या कर्जाच्या रकमेचा अपहार केला.
सुमीत गायकवाड, राजू बोराडे, रोशन, दानिश आणि शाहरुख अशा पाच आरोपींविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार कुर्ला येथे राहत असून एका वित्तपुरवठा कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्यांच्या कंपनीत ६५ महिलांनी आयफोनसाठी अर्ज केला होता. अर्जानंतर त्यांना सुमारे २० लाखांचे कर्ज मंजूर झाले होते. मात्र कर्ज दिल्यानंतर त्यांनी कर्जाचे नियमित हप्ते भरले नव्हते. या महिलांची चौकशी करण्यात आली असता या कर्जाशी या महिलांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आणि लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी दिलेली कागदपत्रे या टोळीने वापरल्याचेही उघड झाले. सुमीत आणि राजू यांनी या महिलांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेताना कागदपत्रे घेतली होती. त्यावेळी त्यांना अंधेरी आणि कुर्ला येथील एका मोबाईल शॉपमध्ये आणले आणि आयफोन घेऊन त्यांचे फोटो काढण्यात आले होते. एक महिन्याचा लाडक्या बहिणीचा अडीच हजारांचा हप्ता रोख देण्यात आला व त्यांना पुढील महिन्यात त्यांच्या बँक खात्यात पुढील हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र नंतर लाडक्या बहिणीचा हप्ता बँक खात्यात आलाच नाही. सुमीत आणि राजूने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने या महिलांच्या कागदपत्रांवरुन त्यांच्याच नावाने आयफोनसाठी सुमारे २० लाखांचे कर्ज घेतले. कर्जाची परतफेड न करता कंपनीची फसवणुक करुन ते पळून गेले. कर्जाचे हप्ते न आल्याने कंपनीने शहानिशा केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.