

घाटकोपर: कुर्ला येथील जरीमरी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट न्यायाधीशपदापर्यंत मजल मारली. शेख अहमद अली यांचे चिरंजीव ॲड. सैफ अहमद अली शेख यांची अलीकडेच न्यायाधीश म्हणून निवड झाली.
शेख अहमद अली हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर येथील पाणी खात्यात कार्यरत आहेत. त्यांची सेवा निवृत्ती जवळ आली असतानाच मुलाने मिळवलेले हे यश त्यांच्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण ठरले आहे.
जरीमरीसारख्या झोपडपट्टी परिसरातून शिक्षण घेत कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर सैफ शेख यांनी हे यश संपादन केले. सैफ शेख हे गेली तीन वर्ष अंधेरी कोर्ट तसेच हायकोर्ट येथे वकिली करत आहेत. त्यांनी 2022 साली एलएलबी पूर्ण केले.
त्यानंतर पुण्यातील गणेश अकॅडमीमध्ये मार्गदर्शन घेत त्यांनी न्यायाधीशपदाची परीक्षा दिली मात्र, पहिल्याच प्रयत्नात केवळ चार गुणांनी अपयश आले. त्यातून खचून न जाता पुन्हा परीक्षा देत 250 पैकी 156 गुण मिळवून त्यांनी यश मिळवले.
एकूण 40 जागांमध्ये सैफ शेख यांनी 23 वा क्रमांक मिळवत आपले स्थान निश्चित केले. बाप म्हणून आनंद खूप मोठा आहे. तो शब्दात व्यक्त नाही होणार. जिद्द आणि धाडस या
जोरावर त्याचे स्वप्न त्याने स्वतः पूर्ण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्याने मिळवलेले हे यश युवकांसाठी प्रेरणादायी आहे. जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असल्यास कोणतीही अडचण मोठी नसते, हे त्याने सिद्ध केले.
शेख अहमद अली ( वडील )