

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा खार येथील स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री फोडला. याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे (शिंदे गट) सरचिटणीस राहुल कानल यांच्यासह १९ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे कॉमेडियन कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. या प्रकरणानंतर ठाकरे गटाने सरकारवर कडवट टीका केली आहे.
कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ही टीका समाजमाध्यमावर पसरल्याने शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाले. राहुल कनाल आणि कुणाली सरमळकर यांनी पदाधिकाऱ्यांसोबत जात कुणालच्या स्टुडिओमध्ये तोडफोड केली. त्यानंतर कुणाल कामराच्याविरोधात शिंदेंचे आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. कुणाल कामराने शिंदेंची माफी मागावी अन्यथा त्याला फिरू दिले जाणार नाही, असा इशारा खा. नरेश म्हस्के यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात दाढी गँग सक्रीय, गृहमंत्री महोदय बंदोबस्त करा, अशी पोस्ट ठाकरे गटाचे राज्य संपर्क समन्वयक अखिल चित्रे यांनी केली आहे. चित्रे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकारमधील शिंदे गटाचे कार्यकर्ते एका कॉमेडी शो चा स्टुडिओ फोडतात, कुठे आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था? सत्ताधारी आहेत म्हणून ते राज्यात हवा तसा धुडगूस घालू शकतात का? शिंदे गटाचे कार्यकर्ते गृहमंत्री असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत का? असा सवाल चित्रे यांनी केला आहे.