

मुंबई : कुलाब्यातील पालिकेच्या ऑनलाइन शाळेत शिकणाऱ्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांना कुलाबा मार्केट एल.पी. मराठी शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पर्यायी जागा उपलब्ध करून शाळा सुरू करण्यात आली आहे. माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या पाठपुराव्याने ही पर्यायी जागा मिळाल्याने पालकांनी नार्वेकर यांचे आभार मानले.
दोन महिन्यांपूर्वी कुलाब्यातील एन. ए. सावंत मार्गावरील मुंबई पब्लिक स्कूलच्या दोन्ही इमारतींना धोकादायक घोषित करण्यात आले होते. यामुळे आठ माध्यमांच्या सुमारे २,८०० विद्यार्थ्यांवर परिणाम झाला. इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली, मात्र इंग्रजी माध्यमाच्या सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना जुलैपासून ऑनलाइन शिकावे लागत होते. याबाबत नार्वेकर यांनी ६ ऑगस्ट रोजी राज्य बाल हक्क आयोगाला पत्र लिहून ऑनलाइन शाळेमुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी शाळेबाहेर मोर्चा काढला होता.
मकरंद नार्वेकर यांच्यामुळे आमची मुले शाळेत परतली आहेत. सुविधांची तपासणी करण्यासाठी ते आमच्या आधी नवीन शाळेत पोहोचले. आमची मुले ऑफलाइन शाळेत परतली आहेत याचा आम्हाला खरोखर आनंद आहे.
कुमार राठोड, श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांचे वडील.
महापालिका प्रशासनाने मागणीची दखल घेत इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था केली. मुले पुन्हा शाळेत परतली याचा खूप आनंद आहे. पालकांची आणि विद्यार्थ्यांची ही लढाई यशस्वी झाली.
मकरंद नार्वेकर, माजी नगरसेवक.