मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यभरातील सुमारे 1 लाख 38 हजार 262 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा कोल्हापूर जिल्ह्याला बसला असून, कोल्हापुरातील करवीर, कागल, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, आजरा आदी तालुक्यांतील एकूण 26 हजार 582 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
राज्यातील 25 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, एकूण 127 तालुके बाधित झाले आहेत. अतिवृष्टीने सुमारे 487 हेक्टर क्षेत्र जमीन खरडून गेल्याची माहिती पीक पाहणी अहवालातून समोर आली आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यंदाचा पीक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार, राज्यात 1 जून ते 29 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 130 टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे; तर राज्यात सोमवारपर्यंत एकूण 136 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पीक पेरणी झाली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या पेरणीचे प्रमाण 128 इतके असल्याचे पीक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे एकूण 127 तालुके बाधित झाले असून, 25 जिल्ह्यांना फटका बसला आहे. यात प्रामुख्याने भात, नाचणी, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाल्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पीक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार, अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गातील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वैभववाडी, देवगड, मालवण, कणकवली, वेंगुर्ला आदी तालुक्यांतील भाताचे पीक बाधित झाले आहे. सुमारे 1 हजार 440 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; तर रायगड येथील अलिबाग, मुरुड, महाड, श्रीवर्धन, पेण, खालापूर, रोहा, पोलादपूर, म्हसाळा, सुधारगड, उरण आणि कर्जत या तालुक्यांतील 3,027.81 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, येथील भाताचे पीक बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव येथील सुमारे 11 हजार 163 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, येथील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, केळीची पिके बाधित झाली आहेत. याशिवाय गडचिरोली येथील धानोरा, मुलचेरा, वडसा, आरमेरी, कुरखेडा, कोरची येथील 11 हजार 480 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, येथील भात, कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाल्याचे पीक बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.
पीक पाहणी अहवालानुसार, राज्यात 29 जुलैपर्यंत पीकनिहाय खरीप पेरणीची आकडेवारी लक्षात घेता सर्वाधिक तेलबियांची 116 टक्के पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ कापूस 96 टक्के, अन्नधान्य 78 टक्के आणि तृणधान्यांचा 73 टक्के इतका पेरा झाला आहे. एकूण 50.9 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबिया, अन्नधान्य 43.9 लाख हेक्टर, कापूस 40.5 लाख हेक्टर आणि तृणधान्य 25.2 लाख हेक्टर असे पेरणी क्षेत्र आहे.
दरम्यान, 29 जुलैपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 1 कोटी 56 लाख शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. त्यातून राज्यभरातील 104 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत असणार आहे.