

मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : विदर्भ वगळता महाराष्ट्रातील बहुतांश विभागांत शिवसेना शिंदे गटाने दमदार कामगिरी केल्यामुळे आता या पक्षाला लोकप्रियतेची जाणीव झाली आहे.निवडून आलेल्या नगरसेवकांत भारतीय जनता पक्षाचे 45 टक्क्यांहून जास्त नगरसेवक आहेत. हे अभूतपूर्व यश असले तरी नगराध्यक्षपदावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 57 ठिकाणी निवडून आले आहेत. मुंबईशी संबंध असलेल्या कोकण किनारपट्टीतील बहुतांश जिल्ह्यांवर शिंदे यांच्या पक्षाने निकालातून आपले वर्चस्व स्थापन केले असल्यामुळे मुंबईतील समसमान जागांच्या आग्रहावर उपमुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा भर देतील, असे मानले जाते आहे.
भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे आगळे आहे. 45 टक्क्यांपेक्षा जास्त नगरसेवक एकाच पक्षाचे असण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मिळालेले यश हे त्यांनी केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली हे सांगणारे नसून ते महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे बडे नेते ठरले आहेत. अधिकृत शिवसेना आम्हीच, असे ते सांगत असतात. त्या वक्तव्यावर जनतेने मोहोर उमटवली आहे.
आजच्या निकालांचा अन्वयार्थ लावत असता शिंदे यांचा पक्ष राज्यातील क्रमांक दोनच्या दर्जाला पोहोचला असून त्यांनी जिंकलेल्या नगराध्यक्षपदांची जागा काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाच्या एकत्रित बेरजेपेक्षाही जास्त आहेत. त्यामुळेच मुंबईतील मराठी माणूस आमचा मतदार आहे, आमचा आवाज ऐका आणि आम्हाला बरोबरीचे स्थान द्या, ही मागणी जोर घेण्याची शक्यता आज वर्तवली जाऊ लागली.
ठाणे येथे शिंदे यांचे नेतृत्व असल्याने तेथेही आता अधिक जागा मागितल्या जातील. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामामुळे तेथेही पडती भूमिका घेण्यास शिंदे गट नकार देईल, अशी चिन्हे आहेत. नवी मुंबई येथे नोकरी युती होणे दुरापास्त मानले जाते आहे. दोन्ही पक्ष आपापल्या मागण्या मागे घेणार नाहीत अशी ही स्थिती आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष व्यवहाराला उत्तम जागतात, एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे वॉर्डासंबंधीचा दावा युती तुटेपर्यंत पोहोचणार नाही. मात्र शिंदे नव्याने लक्षात आलेल्या त्यांच्या ताकदीचा हवाला देत जास्त जागा मागतील हे स्पष्ट दिसते आहे.
मुंबई महानगरपालिकेबाबतची बोलणी सध्या ठप्प झाली असून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना जागांची कोष्टके देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार यांना युतीत घेणे शक्य नसल्याचे मतही दोन्ही पक्षांनी आधीच व्यक्त केले आहे. मुंबईत नवाब मलिक यांचे नेतृत्व बदलायची अजितदादा गटाने ऐनवेळी तयारी दाखवल्यास त्यांना सामावून घेत स्थान द्यावे लागेल, असेही दिसते. पुणे जिल्ह्यावरील वर्चस्व अजितदादांनी राखले असून तेही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये दमदार कामगिरी करतील, अशी शक्यता आजच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निकालांनी पुढे आणली आहे.