

मुंबई : कूपर रुणालयातील उंदरांनी आरोग्य विभागाची नाचक्की केली असताना केईएममधील नर्सिंगच्या भोईवाडा शाळेतील वसतिगृहातील विद्यार्थिनींचीही उंदरांनी झोप उडवली आहे. झोपेत असताना उंदिर पायांना चावा घेत आहेत. तर सकाळी कपडे, पुस्तके कशी असतील याची शाश्वती राहिली नसल्याची व्यथा येथील विद्यार्थीनींनी व्यक्त केली आहे.
याचबरोबर पिण्याच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंतच्या समस्याही त्यांनी मांडल्या आहेत. येथील उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी गेले दहा दिवसांपासून प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
भोईवाडा शाळेत गेल्या वर्षी हे वसतिगृह हलवले आहे. भोईवाडा शाळेच्या इमारतीत राहणार्या एका नर्सिंग विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पूर्वी वसतिगृहाच्या एका खोलीत फक्त दोन विद्यार्थी राहत होत्या. परंतु आता महानगरपालिका शाळेच्या इमारतीत 16 विद्यार्थ्यांना एकाच खोलीत राहावे लागत आहे.
शाळेतील वर्गखोल्या घाईघाईने वसतिगृहात रूपांतरित करण्यात आल्या. यामध्ये पुरेशा सुविधा नाहीत. इमारतीत कपाटांची व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी आणि बेडची पुरेशी सुविधा नाही. इमारतीची लिफ्ट देखील अनेकदा बिघडलेली असते. या परिसरात उंदराचा सुळसुळाट असल्याने त्यांचा खोलीत नियमित वावर असतो.
विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टींचा त्रास होत आहे. या संदर्भात डॉ. रावत यांच्याकडे तक्रारही करण्यात आली असल्याचे विद्यार्थीनीकडून सांगण्यात आले. याबाबत अधिष्ठाता डॉ.संगीता रावत यांनी सांगितले की, इमारतीची पाहणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच उंदरांचा नायनाट करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. मात्र उंदरांचा त्रास कमी झालेला नाही.
केईएम रुग्णालय आवारातील वसतिगृह आणि नर्सिंग कॉलेजच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी दुरुस्तीसाठी त्या वास्तू पालिकेने रिकाम्या करीत 150 नर्सिंग विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या भोईवाडा शाळेत आणि 150 विद्यार्थ्यांना सीव्हीटीएसच्या नर्सिंग क्वार्टरमध्ये हलवण्यात आले आहे. भोईवाडा येथील पाच मजली इमारतीत चार मजल्यांवर विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीत प्रथम वर्षाचे 50 आणि द्वितीय वर्षाचे 100 विद्यार्थी राहतात.