

ठाणे : दहशतवादविरोधी एका मोठ्या मोहिमेंतर्गत, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केंद्रीय तपास संस्था आणि राज्य एटीएस युनिटस्च्या समन्वयाने संपूर्ण भारतात ‘इसिस’शी संबंधित ‘प्रोजेक्ट मुस्तफा’ या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून पाच कट्टरपंथी तरुणांना अटक केली आहे. त्यात कल्याण, मुंब्य्रातील दोन तरुणांचा समावेश आहे. ‘प्रोजेक्ट मुस्तफा’च्या नावाखाली भारतातील काही राजकीय नेत्यांच्या हत्या आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा त्यांनी कट रचला होता, असे तपासात उघड झाले आहे.
अटक केलेले आरोपी 20 ते 26 वर्षे वयोगटातील असून, पाकिस्तानस्थित हँडलरच्या थेट देखरेखीखाली भारतात कट्टरपंथीय तरुणांचे नेटवर्क स्थापित करण्याचे काम करत होते. या मॉड्यूलचे नेतृत्व झारखंडमधील बोकारो येथील अशर दानिश (वय 23) करत होता. इतरांची अटक केलेल्यांची नावे आफताब कुरेशी (रा. कल्याण), सुफियान अबुबकर खान (रा. मुंब्रा), मोहम्मद हुजैफ यमन (रा. निजामाबाद, तेलंगणा) आणि कामरान कुरेशी ऊर्फ समर खान (रा. राजगड, मध्य प्रदेश) अशी नावे आहेत.
पोलिसांनी या आठवड्यात दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वेस्टेशनवरून कल्याणचा आफताब आणि त्याचा मुंब्य्रातील साथीदार सुफियान अबुबकर खान या दोघांना अटक केली. दोघेही दिल्लीहून मुंबईला परतण्याच्या तयारीत असताना त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडून 32 बोअरची दोन सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसे सापडली आहेत. याप्रकरणी दिल्लीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (विशेष कक्ष) प्रमोद कुशवाह म्हणाले, या लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे शिकवण्यात आले आणि त्यांना दुहेरी मोहीम पार पाडण्याचे काम देण्यात आले. पहिले पाऊल म्हणजे दहशतवादी कारवायांसाठी गट तयार करणे. दुसरे म्हणजे गजवा-ए-हिंद शैलीचा जिहाद राबवणे. यात भारतातील काही राजकीय नेत्यांच्या हत्या करणे आणि दहशतवादी हल्ले घडवून आणणे या कामांचा समावेश होता.
स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि शस्त्रांची वाहतूक करताना या दोघांना अटक करण्यात आली. काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोघांच्या अटकेनंतर लगेच, दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएससोबत समन्वय साधून कल्याण आणि मुंब्रा येथील त्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले आणि डिजिटल उपकरणांसह गुन्हेगारी साहित्य जप्त केले.
यातील मुख्य सूत्रधार दानिश याने ‘सीईओ’ आणि ‘प्रोफेसर’ या सांकेतिक नावांचा वापर करून एक व्यावसायिक कंपनी चालवण्याचा घाट घातला होता. त्याला गझवा नेता म्हटले जात असे. त्याच्या ताब्यातून स्फोटके बनवण्यासाठी लागणारे साहित्य, पिस्तूल, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तो पाकिस्तानमधील हँडलरच्या थेट संपर्कात होता आणि ‘प्रोजेक्ट मुस्तफा’ नावाचा 40 सदस्यांचा सोशल मीडिया ग्रुप चालवत होता. जिहादी सामग्री प्रसारित करणे आणि सदस्यांची भरती करणे हे या ग्रुपचे काम होते.