

Kasturba Hospital Controversy: "कस्तुरबा रुग्णालयातील 'पुस्तकफेक' झालीच नाही. प्रकरणामागील आका शोधा," अशी मागणी मुंबईच्या माजी महापाैर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. राजेंद्र कदम यांच्या पुस्तक वाटण्याच्या भूमिकेवरच " त्यांनी शंका घेतली असून, दोन्ही बाजूंची चौकशी करण्याचीही मागणी केली. ‘देशाचे दुश्मन’ हे पुस्तक १९२५ साली लिहिलेलं आहे. हे पुस्तक वाटून राजेंद्र कदम यांना काय साध्य करायचं होतं? असा सवाल करत, या संपूर्ण घटनेमागील आका कोण आहे, हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी चौकशी करावी," अशी मागणीही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.
कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचारी राजेंद्र कदम यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीवेळी सहकाऱ्यांना दिनकर जवळकर लिखित ‘देशाचे दुश्मन’ आणि प्रबोधनकार ठाकरेंचे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ ही दोन पुस्तके वाटल्याने वाद निर्माण झाला.तेथील महिला कर्मचाऱ्यांनी ती पुस्तके कदम यांच्या तोंडावर फेकून मारली. “आमच्या धर्माचा अपमान सहन करणार नाही,” असे सांगून त्यांनी पुस्तके स्वीकारण्यास नकार दिला.त्यावरून रुग्णालयात मोठा वाद झाला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला.मुंबईच्या माजी महापौर व ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर यांनी कस्तुरबा रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.यानंतर किशोरी पेडणेकर यांनी राजेंद्र कदम यांच्या पुस्तक वाटण्याच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली.
माध्यमांशी बोलताना पेडणेकर म्हणाल्या,"या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आम्ही शिवसैनिक आणि आमदार मनोज जामसुतकर इथे आलो. बंदी घातलेलं पुस्तक मिळालं कुठून? १०० वर्षांपूर्वीची पुस्तकं वाटून काय मिळवायचं होतं?प्रबोधनकारांचं पुस्तक मागे होतं, पण कोणीही पुस्तकं फेकलेली नाहीत. 'पुस्तक नाकारणं' आणि 'फेकणं' यात फरक आहे.समाजात तेढ निर्माण करणारी पुस्तके नकोत, असं परिचारिकांचं म्हणणं होतं.कोणीही पुस्तकं झिडकारली नाहीत, ती केवळ नाकारली.'पुस्तकं फेकल्याचा व्हिडिओ' खरा की खोटा, हे पोलिसांनी शोधून काढावं. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी चौकशी करावी.ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडलेली आहे. एक महिना लागला तक्रार द्यायला, आणि दोन महिन्यांनी व्हिडिओ व्हायरल झाला.एखादा माणूस नीट वागणारा नसेल, चांगला वागणारा नसेल, आणि त्याने भेटवस्तू दिली, तर ती आपण नाकारतो — हेच झालं."
पुस्तके नाकारणाऱ्या परिचारिका म्हणाल्या, "राजेंद्र कदम हे दोन पुस्तके घेऊन आले. आमच्या टेबलावर ती पुस्तकं ठेवून निघून गेले. त्यांना सांगितलं की आम्हाला ही पुस्तकं नकोत.प्रबोधनकार ठाकरेंचं नाव घेऊन या गोष्टीला वेगळं वळण दिलं गेलं आहे.माझ्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे काही तेढ निर्माण झाला असेल, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करते.मी मुंबईत ठाकरेंमुळेच परिचारिका म्हणून काम करत आहे."