Municipal school bench shortage : काजूपाडा पालिका शाळेत बाकांअभावी विद्यार्थी जमिनीवर
मुंबई : आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेच्या एका शाळेतील मुलांना बाके नसल्याने जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. तीन वर्षांपासून मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई पब्लिक स्कूल काजूपाडा या हिंदी माध्यमाच्या शाळेत ही गैरसोय सुरू असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे भीम आर्मीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शाळेत वर्ग खोल्याही कमी असल्याने एकाच वर्गात दोन वर्ग भरविले जात आहेत. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाके नाहीत. तीन वर्षांपासून शिक्षकानी महापालिकेच्या शिक्षण अधिकारी यांना याबाबत अनेक पत्र दिली आहेत. मात्र बाके मिळालेली नाहीत. त्यामुळे जमिनीवरच विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या शिक्षण उपायुक्त प्राची जांभेकर आणि शिक्षण अधिकारी सुजेता खैरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही. शिक्षण विभागासाठी 3 हजार 955 कोटींंची तरतूद केली आहे. दरवर्षी यात वाढ होत असते. तरीही शाळांना भौतिक सुविधा मिळत नसल्याचे दुर्देव आहे.
महानगरपालिका शाळांत गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, त्याकडे पालिका प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ नाही. श्रीमंत महापालिकेला शाळेला बाके देण्यासाठी निधी नाही का, याचा जाब प्रशासनाला विचारणार आहोत.
अशोक कांबळे, राष्ट्रीय महासचिव, भीम आर्मी

