

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात एका पारसी कुटुंबियांच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेली परस्पर विक्री आणि त्याच्या नियमबाह्य नोंदणी केल्या प्रकरणी सह-दुय्यम निबंधक ईश्वर डी. देवशी यांना निलंबित करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत केली.
या प्रकरणाची विभागीय चौकशी येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. मुंबईत जुहू येथील एका पारसी कुटुंबीयांची मिळकत परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून विक्री नोंदणी करण्यात आली.
त्याबाबत संबंधित अधिकारी देवशी यांची विभागीय चौकशी करण्यात येईल. संबंधित मालमत्ता शासनजमा करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.
विभागीय चौकशी आणि फौजदारी
निलंबन ही केवळ प्रक्रियेचा भाग असून चौकशीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई केली आहे. खरा दोष विभागीय चौकशीत सिद्ध होईल. तीन महिन्यांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर देवशी यांच्यावर केवळ निलंबनच नव्हे, तर त्यापेक्षाही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.