Jogeshwari land reservation : जोगेश्वरीच्या भूखंडावरून भाजपा-शिवसेनेत जुंपली

शिवसेनेच्या विरोधात भाजपाचा सभात्याग
BMC
BMC pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : जोगेश्वरी पूर्व मजास गाव येथील पुनर्वसन आणि पुनःस्थापना आरक्षण रद्द करून, भूखंडाची जागा लगतच्या निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंजूर करू नये, यासाठी भाजपाने आग्रह धरला. मात्र याकडे दुर्लक्ष करत शिवसेनेने सुधार समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे संतापलेल्या भाजपा सदस्यांनी थेट सभात्याग केला. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उबाठा सेनेला बहुमतापासून दूर ठेवण्यात भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला यश आले. सुरुवातीचे काही महिने कारभार सुरळीत चालल्यावर आता सुधार समिती व विषय समितीच्या बैठकीत भाजपा आणि शिंदे गट शिवसेनेच्या नगरसेवकांतील मतभेद उघडपणे दिसून येत आहेत. बुधवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत त्याची प्रचिती आली आहे.

BMC
MBBS fee hike : वैद्यकीय अभ्यासक्रमात ५६ टक्के शुल्कवाढ

पालिकेच्या के-पूर्व विभागाचा मंजूर पुनर्रचित विकास आराखडा २०३४ नुसार मजास गावातील भूखंड डाकघर, पोलीस ठाणे, क्रीडांगण, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महानगरपालिकेचा दवाखाना, आरोग्य केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आदीसाठी आरक्षित आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये मुख्य सचिव (नगर विकास व गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठकीत आरक्षण रद्द करण्यासाठी म्हाडाला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. या भूखंडाच्या काही भागावर मेघवाडी सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आहे. या भूखंडाचे क्षेत्रफळ सुमारे १८०२ चौरस मीटर इतके आहे.

मतभेद चिघळण्याची भीती

या भूखंडावर आरक्षण असल्यामुळे गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास करणे शक्य नव्हते. त्यानुसार हे क्षेत्र निवासी क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत ऑगस्ट २०२६ मध्ये सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर भाजपा सदस्यांनी चर्चा करण्याची मागणी करून तो सध्या स्थगित ठेवावा, असे मत व्यक्त केले. परंतु मेघवाडी सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेतील नागरिकांचा विचार करून हा प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असल्याचे सांगत सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी प्रस्ताव मतास टाकून मंजूर करून घेतला.

त्यामुळे सत्तेतील मोठा पक्ष असतानाही आपल्याला विचारात न घेतल्यामुळे भाजपाच्या सदस्यांनी शिवसेनेच्या या कृतीचा निषेध करत सभात्याग केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपा-शिवसेनेमध्ये एकमत नसल्याचे समोर आले आहे. सत्तेतील एका मोठ्या पक्षाने सभात्याग केल्यामुळे विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पालिकेत भाजप व शिंदे गट शिवसेनेत निर्माण होणारा दुरावा मिटविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BMC
Maharashtra development projects : साडेसात हजार हेक्टर वनेतर जमिनीची ‘लँड बँक’ सज्ज

पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव रोखण्याची भाजपाची रणनीती

सुधार समितीत भाजपाला अंधारात ठेवून प्रस्ताव परस्पर मंजूर केला असला तरी महापालिका सभागृहात प्रस्ताव रोखण्याची भाजपाने रणनीती आखली आहे. मात्र मुंबई महापालिका सभागृहात ही भाजपाच्या साथीने हा प्रस्ताव मंजूर करू असे मत शिवसेनेच्या एका वरिष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केले. दरम्यान या वादाबाबत सुधार समितीतील भाजपा सदस्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे आता सभागृहात या प्रस्तावावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वसाधारण सभेमध्ये आकडेवारीच्या खेळाच्या आधारावर भाजपाने ठराव फेटाळल्यास वाद चिघळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news