

मुंबई : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदीराचा गाभारा पाडण्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र विरोध केला आहे. आज (दि. १२) सकाळी आमदार आव्हाड तुळजापूरच्या दिशेने रवाना झाले असून मंदिरातील पुजारांनी बोलावलं म्हणून जात असल्याचे त्यांनी सांगितलं. गावकऱ्यांशी आणि भक्तांशी बोलून भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तुळजापूरला जाण्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मंदिर जमीनदोस्त करून तिथे नवीन मंदिर बांधायचा घाट घालायचा आहे. जो गाभारा पाडणार आहेत त्या गाभाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानीचा आशीर्वाद घेऊन स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या राज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानी पावन झालेले हे मंदिर आहे. जिथे ते उभे राहिले ते तुम्ही पडणार आहात का? जे औरंगजेबाला, अफजल खानाला जमलं नाही ते काम सरकार करत आहे.
गावकऱ्यांना आणि भाविकांना विश्वासात घ्यावे. प्राचीन मंदिर तोडणे हे जगाच्या पाठीवर कुठेही झाले नाही. प्राचीन वास्तूंचे जतन केले जाते पण इथे प्राचीन मंदिर तोडायला निघालेत. मला मंदिरातल्या पुजाऱ्यांनी बोलावलं आहे. मंदिराचा कळस पडणार असतील तर माझी महाराष्ट्रातच नाही देशभरातल्या भाविकांना विनंती आहे की विरोध करा. माझी आई तुळजाभवानीवर प्रचंड श्रद्धा आहे. मी हिंदू धर्माची पाठराखण करत असतो. मला हिंदू धर्म कोणी शिकवायला जाऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला.