

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीतच पक्षाकडे करून राष्ट्रवादीत खळबळ उडवून दिली. या विषयाला जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात खेळीमेळीत उत्तर दिले.
जयंत पाटील म्हणाले, अजित पवार यांनी मी किती महिने पूर्ण केले आहेत ते भाषणात सांगितलं आहे. 5 वर्ष 1 महिना मला प्रदेशाध्यक्षपदावर पूर्ण झाले असल्याचे त्यांनी म्हटले. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात अध्यक्ष महोदय उल्लेख केला. दादांनी विधानसभा काढली म्हणून हा शब्द आला असल्याचे म्हणत 'दादा खरंतर तुम्ही विधानभवनात जायला पाहिजे होते. सत्ताधारी किती वाकतात, कसे वागतात हे बघणं विरोधी पक्षनेत्याचं काम आहे' असेही पाटील यांनी म्हटले.
जयंत पाटील यांनी पक्ष संघटना बळकट करण्याचे आवाहन करताना बुथ कमिटी आणखी बळकट करण्याची गरज असल्याचे म्हटले. नेत्यांची भाषणे दमदार होतील पण मैदानावर काम करायला लोक नसतील त्याठिकाणी पराभव होईल, असेही पाटील यांनी म्हटले. पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली आहे. मात्र भारतात पक्ष पोहचवण्यासाठी सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल चांगल काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आज राज्यभरात दंगली घडत आहे. दंगलीचा पॅटर्न बघितला तर लक्षात येईल की जिथे भाजप शिंदे गटाची ताकद नाही तिथे या दंगली घडत असल्याचा दावा त्यांनी केला. मला सरकारमधील मंत्र्यांना सांगायचे आहे की तुम्ही काहीही करा पण महाराष्ट्रात हा प्रकार थांबवा असे आवाहन त्यांनी केले. भाजपने ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाची फसवणूक केली असल्याचेही त्यांनी म्हटले. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेले आहे याची माहिती घ्या, त्यांचे धागेदोरे नागपूरच्या कोणत्या नेत्यापर्यंत आहे. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मराठा आरक्षणाच्या विरोधात नेमकं कोण आहे असेही पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या पाच वर्षांपासून माझ्याकडे आहे. पक्षाच्या घटनेतील तरतुदीनुसार दर तीन वर्षांनी पद बदलण्याची तरतूद आहे. त्यानुसार माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वीच संपला आहे. अजित पवार यांनीही माझा कार्यकाळ किती झाला. हे मोजले आहे.
– जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस