मुंबई : पवन होन्याळकर
युवकांना उद्योगसुसंगत, रोजगाराभिमुख कौशल्ये देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमां'ला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. या अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये आयटीआयमध्ये शिकणारे किंवा आयटीआय पूर्ण केलेले विद्यार्थीच आघाडीवर आहेत, कलल विद्याथाच आघाडावर आहत, त्यामुळे 'एकाच ट्रेडचे दुहेरी शिक्षण' सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी या 'अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम योजनेच्या उपक्रमाचा गाजावाजा करत प्रारंभकरण्यात आला. दरमहा एक ते पाच हजार रुपये शुल्क, २५ टक्के जागा संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी आणि उर्वरित जागा बाह्य उमेदवारांसाठी अशी रचना करण्यात आली. पात्रतेमध्ये आयटीआयचे विद्यमान व उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच दहावी, बारावी, पदविका किंवा पदवी शिकणाऱ्यांचा समावेश करण्यात आला. याच निकषांचा फायदा घेत उच्च स्तरावरील संबंधित व्यवसायात प्रशिक्षण घेतलेले तसेच शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले किंवा आता आयटीआय सुरू असलेले प्रशिक्षणार्थीनी या अल्प मुदतीच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कमी स्तरावरील व्यवसायात प्रवेश घेत असल्याचे चित्र समोर आले आहे.
पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ५४ हजार २१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यापैकी तब्बल २५ हजार ४३७ म्हणजेच सुमारे ४७ टक्के विद्यार्थी आयटीआय पार्श्वभूमीचे आहेत. उर्वरित २८ हजार ७८० बाह्य उमेदवार आहेत. नाशिक, यवतमाळ, अमरावती, नांदेडसारख्या जिल्ह्यांत एकूण प्रवेशसंख्या मोठी आहे. यामुळे कौशल्य उन्नतीऐवजी दुहेरी व अनावश्यक प्रशिक्षणाचा प्रकार वाढत असून, योजनेच्या मूळ उद्दिष्टच धाब्यावर बसला आहे. ट्रेड-केंद्रित अभ्यासक्रमांत आयटीआय विद्यार्थ्यांचेच प्राबल्य आहे.
इलेक्ट्रिशियन, सीएनसी ऑपरेटर, वेल्डिंग, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग, सोलार पीव्ही इन्स्टॉलेशन यांसारखे ट्रेड आयटीआयमध्ये आधीच एक ते दोन वर्षांच्या कालावधीत शिकवले जातात. तरीही हेच अभ्यासक्रम पुन्हा अल्पमुदतीच्या स्वरूपात आहेत. यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्राचार्यही नाराजी व्यक्त करत आहेत.
योजनेचा मूळ उद्देश शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणानंतरही रोजगार न मिळालेल्या, कौशल्यविरहित युवकांना प्रशिक्षण देण्याचा होता. मात्र प्रत्यक्षात आधीच प्रशिक्षण घेतलेले युवक पुन्हा या अभ्यासक्रमांत प्रवेश घेतलेला आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, संगणक हार्डवेअर-नेटवर्किंग, आयटी व डिजिटल कौशल्यांशी संबंधित अभ्यासक्रमांत आयटीआय बाहेरील उमेदवारांचा सहभाग तुलनेने अधिक असल्याचे दिसत आहे. यामुळे उद्योगांना आवश्यक नव्या कौशल्यांचा विस्तार करण्याऐवजी पारंपरिक ट्रेडमध्येच पुन्हा-पुन्हा प्रशिक्षण दिले जात असल्याची टीका होत आहे.
नवी दिल्लीतील प्रशिक्षण महासंचलनालयांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार औद्योगिक प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना किमान २४० तासांचे अद्ययावत, उद्योगसुसंगत अल्प मुदतीचे प्रशिक्षण देऊन उद्योग आस्थापनांच्या मागणीनुसार रोजगारक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची स्पष्ट जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयावर आहे. मात्र प्रत्यक्षात राज्यातील सर्वच संस्थामध्ये विभागाचा या ना त्या कारणाने होत असलेला हस्तक्षेप यामुळे प्रशिक्षण व मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष होत आहे, प्रशासकीय व इतर दुय्यम बाबींनाच प्राधान्य दिले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या उदासीनतेचा थेट परिणाम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्राचार्य व निदेशकांच्या कार्यक्षमतेवर होत असून, गेल्या काही वर्षात प्रशिक्षण यंत्रणेची दिशा विनाकारण लादलेल्या योजनांमुळे भरकटत चालल्याची गंभीर बाब पुढे आल्याची महिती संचानलायातीलच सूत्रांनी दिली.