

मुंबई : गुजरातमधून महाराष्ट्रात होणाऱ्या इंधन आणि एलपीजी गॅसच्या आंतरराज्यीय तस्करीचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. या पथकाने १ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांना गुप्त माहितीच्या आधारे, गुजरात-धुळे हायवेवरील दहिवल गाव येथील 'अन्नपूर्णा धाब्या'च्या मागे सुरू असलेल्या अवैध अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत १ कोटी ५५ लाख ९५ हजार ११४ रुपये किमतीचे दोन मोठे टँकर, वाहने आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून पुरवठा विभागात प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी 'जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरातवरून जळगावच्या दिशेने येणारा हा अवैध साठा नेमका कोठून लोड करण्यात आला होता आणि महाराष्ट्रात हा काळाबाजार कोणाच्या फायद्यासाठी केला जाणार होता, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या अवैध इंधन आणि गॅस तस्करांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा डांगे यांनी दिला आहे.
या कारवाईत राज्य दक्षता पथकातील शिधावाटप निरीक्षक अमोल बुरटे, राजेश सोरते, राहूल इंगळे, पवन कुंभले, रविंद्र राठोड, दिपेंद्र परूळेकर, राजीव भेले, देवानंद थोरवे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, अर्चना भगत, पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल कांगणे, मंडळ अधिकारी सुनिल साळूंखे, हेमंत लोंढे, सहभागी होते.
जप्त मुद्देमाल
१७.४२० मेट्रिक टन एलपीजी गॅससह एक टँकर - ८ लाख ६७ हजार
डिझेल टँकर व अतिरिक्त साठा व इतर मुद्देमाल ७६ लाख ७२ हजार
बोलेरो पिकअप - ८ लाख ३५ हजार , आयशर छोटा ४ लाख ५० हजार
व्यावसायिक गॅस सिलेंडर व साहित्य ३ लाख ३० हजार