पुढारी ऑनलाईन डेस्क : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. राज्यातील या धक्कादायक घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळल्याने सरकारने चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने आज सरकारला अहवाल सादर केला. पुतळ्याची योग्य देखभाल केली नसल्याने गंज आणि कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळल्याचे अहवालात म्हटले आहे.
४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. गेल्या महिन्यात किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू होता. त्या काळातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. यानंतर पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीचा मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. सरकारनेही याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने आज अहवाल सादर केला आहे. पुतळ्याची डिझाईन योग्य नसल्याची आणि योग्य देखभाल केली नसल्याचे या अहवालात नमूद केले आहे.