

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज (दि.२१) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. गोळीबारामध्ये 20 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अतुल मोने आणि दिलीप डिसले अशी त्यांची नावे आहेत. (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack)
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले. ज्यात 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची संलग्न संघटना आहे. पाकिस्तानमध्ये राहणारे शेख सज्जाद गुल हा टीआरएफचा प्रमुख आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून मदत केली जात आहे. आम्हीही प्रशासनाच्या संपर्कात आहोत. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. हे सहन न झाल्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पण भारत आणि जम्मू- काश्मीर मागे वळून पाहणार नाही. कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला भारताला करता येतो. कुठल्याही परिस्थितीत देशविरोधी शक्तींचा नायनाट केल्याशिवाय भारत शांत बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातील आता एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक महिला रडत आहे आणि मदत मागत आहे. ती तिथे उपस्थित असलेल्या एका स्थानिक व्यक्तीला सांगत आहे की, ‘दहशतवादी धर्म विचारून गोळ्या घालत होते.’