

मुंबई : भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार हा जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतिबिंब दर्शविणारा आहे. यामुळे महाराष्ट्राला जागतिक व्यापार, गुंतवणूक आणि निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील अन्य जिल्ह्यांतील उद्योग व कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत भारत-यूके मुक्त व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी ब्रिटिश उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल तसेच वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, निर्यातदार उपस्थित होते.
उत्पादन व सेवांना मिळणार गती
या करारामुळे राज्यातील अभियांत्रिकी उद्योग, वाहन व वाहन सुटे भाग उत्पादक, औषधनिर्माण आणि रसायन उद्योगांना मोठ्या संधी उपलब्ध होतील. माहिती-तंत्रज्ञान, फिनटेक, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, शैक्षणिक संस्था आणि सर्जनशील उद्योगांनाही सहकार्याची नवी दारे खुली होतील. नाशिकची द्राक्षे, कोकणचा हापूस आंबा, डाळिंब, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांना ब्रिटनसारख्या उच्च दर्जाच्या ग्राहक बाजारपेठेत अधिक चांगला भाव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.