

मुंबई: देशभरात वाढत्या तापमानामुळे आणि एअर कंडिशनर, कूलर यांसारख्या उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे भारतातील वीज मागणीने हंगामी उच्चांक गाठला आहे. गुरुवारी देशातील शिखर वीज मागणी 240 गिगावॅटपर्यंत पोहोचली. ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 23 एप्रिल रोजी दिवसातील सर्वाधिक पुरवठा 240.12 गिगावॅट इतका नोंदवला गेला. त्याआधी 22 एप्रिल रोजी हा आकडा 239.70 गिगावॅट होता.
यंदाच्या उन्हाळ्यातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर असून, तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत मागणी आणखी वाढू शकते. 2023 च्या सप्टेंबरमध्ये 243.27 गिगावॅटची नोंद झाली होती. हा दुसऱ्या क्रमांकाचा उच्चांक लवकरच मागे पडू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
विक्रमी मागणीचा इतिहास
भारताचा आतापर्यंतचा सर्वकालीन शिखर वीज मागणीचा विक्रम मे 2024 मध्ये 250 गिगावॅट इतका नोंदवला गेला होता. गेल्या वर्षी जून 2025 मध्ये 242.77 गिगावॅटची मागणी नोंदली गेली होती. मात्र, ती सरकारच्या 277 गिगावॅटच्या अंदाजापेक्षा कमी होती.
एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात वीज मागणी तुलनेने कमी होती. 16 एप्रिल रोजी 234.81 गिगावॅटची मागणी नोंदली गेली, तर 17 एप्रिलला ती झपाट्याने वाढून 238.94 गिगावॅटवर पोहोचली.
उष्णतेचा थेट परिणाम
भारतीय हवामान विभागाने उत्तर पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांत आठवड्याच्या शेवटपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांकडून विजेचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ऊर्जा मंत्रालयाने यंदाच्या उन्हाळ्यात देशातील शिखर वीज मागणी सुमारे 270 गिगावॅटपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे वीज वितरण यंत्रणेसाठी पुढील काही आठवडे मोठे आव्हान ठरणार आहेत.